आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात आठवडाभर पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर कालपासून (दि.५) पुन्हा काही भागात पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी दोन वाजता धाराशिव शहरात दमदार पाऊस झाला.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने धाराशिव जिल्ह्याला बुधवारी आणि गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस अजूनही सुरू आहे.
हा पाऊस सर्वदूर असून, जिल्ह्यातील आठही तालुक्यात दमदार पाऊस पडत आहे. जून आणि जुलै महिन्यात पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरी २६४ मिमी पाऊस पडतो.
परंतु, दोन महिन्यात केवळ २४० मिमी पाऊस पडला. हा पाऊस सरासरीच्या ९१% आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज आहे. निम्मा पावसाळा संपला तरी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात अपेक्षित पाणीसाठी झालेला नाही.
त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पावसाची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. वाढत्या उन्हामुळे तापमान ३६ अंशांपर्यंत गेले होते. त्यातच फुलोऱ्यात असलेल्या सोयाबीनला पावसाची गरज होती.
काल आणि आज झालेल्या दमदार पावसाने सोयाबीनसह ऊसाला देखील फायदा झाला आहे. पावसासाठी सध्या पोषक झालेली हवामानप्रणाली पुढील चोवीस तास अशीच राहणार आहे. त्यामुळे बुधवारपेक्षा गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच भागात ४० मिमी पेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
आज आणि उद्या पावसाचा जोर असणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली चक्राकार स्थिती फक्त थोडीशी जमिनीवर आली आहे. त्याचवेळी या चक्राकार स्थितीकडे अरबी समुद्राकडून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या दोन्हींच्या प्रभावाने कमी दाबाचे क्षेत्र किंवा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच दोन्ही समुद्रातील बाष्पांचा पुरवठा या पट्ट्या भोवती होत आहे. त्यामुळे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड व पुण्याचा काही भाग तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात जोरदार पाऊस होत आहे. हीच हवामान प्रणाली २४ तास आधी सक्रिय झाली यामुळे ७ तारखेचा पाऊस हा आपल्याला ६ तारखेला पहायला मिळत आहे. आज आणि उद्याही पावसाचा जोर असाच राहणार आहे.
सूरज जाधव
हवामान अभ्यासक, रुईभर.