प्रतिनिधी / तुळजापूर
तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी दोन दिवसात दोन चेहरे पाहण्याचे भाग्य तुळजापूरकरांना मिळाले आहे. विनोद इज्जपवार यांनी २९ जून रोजी तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला तर गजानन घाडगे यांची तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेश ३० जून रोजी धडकले. दरम्यानच्या काळात दोन दिवसांचे पोलीस निरीक्षक राहिलेल्या इज्जपवार यांनी ३६ तासात तब्बल ४० स्वागत सत्कार स्विकारल्याची चर्चा आहे.
मावळते पोलिस निरीक्षक आजिनाथ काशिद यांच्या बदलीनंतर असलेल्या पदाचा पदभार विनोद इज्जपवार यांनी २९ जून रोजी तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदाचा पदभार स्वीकारला. इज्जपवार यांनी पदभार स्वीकारताच शहरात फेरफटका मारताना भवानी रोडवरील वाहतुकीच्या नियोजनाची माहिती घेतली. मात्र त्यानंतर अचानक ३० जून रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गजानन घाडगे यांच्या नियुक्तीचे आदेश आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान घाडगे यांनी रविवारी पदभार स्वीकारला असून, तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने कारभाराला प्रारंभ केला आहे. दरम्यान २४ तासांत दुसऱ्यांदा पोलीस निरीक्षकाच्या सत्काराची तयारी करण्याची नामुष्की राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर ओढवली आहे. राजकीय, सामाजिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या आणि संवेदनशील अशा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लागावी म्हणून पोलीस दलातील अनेक अधिकारी प्रयत्नशील असतात.आवडीच्या ठिकाणी नियुक्ती मिळावी म्हणून अधिकाऱ्यांत स्पर्धा असते, हे ऐकून असलेल्या तुळजापूरवासियांना या प्रकारामुळे याची देही याची डोळा प्रत्यय आला आहे.
सत्कारासाठी संस्थांची चढाओढ
दोन दिवसांचे पोलीस निरीक्षक इज्जपवार यांनी गुरुवारी (दि. २९) रात्रीपासून ते शुक्रवारी (दि.३०) दिवसभरात तब्बल ४० सत्कार स्विकारल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या सत्कारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र आल्या-आल्या सत्काराची उठाठेव कशासाठी,असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावत आहे.