पोलिस महानिरीक्षक आणि पोलिस अधीक्षक यांची कारवाई
पोलिस कर्मचाऱ्याकडूनच घेतली होती 95 हजारांची लाच
आरंभ मराठी / धाराशिव
मुलाला गुन्ह्यातून वाचवण्यासाठी एका महिला पोलिस कॉन्स्टेबलकडून सुमारे 95 हजारांची लाच घेणाऱ्या धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचा पोलिस निरीक्षक मारुती शेळके यांच्यासह लाच घेण्यासाठी मदत करणारी महिला पोलिस कॉन्स्टेबल मुक्ता लोखंडे हिला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पोलिस महानिरीक्षक आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शुक्रवारी ही कारवाई केली.
दोघांनाही बुधवारी लाच प्रकरणात अटक करण्यात आली होती.पोलिस निरीक्षक मारुती शेळके याना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शेळके याच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक (आयजी) कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावानुसार शेळके याच्यासह कॉन्स्टेबल लोखंडे हिच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे.
वादग्रस्त पोलिस निरीक्षक मारुती शेळके कळंब येथे कार्यरत असताना अनेक वादग्रस्त प्रकरणे समोर आली होती. सर्वसामान्यांवर दादागिरी करून सिंघम म्हणून ओळख निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश स्वतःच्या फायद्यासाठी होता. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार हातात आल्यानंतर त्यांनी तोच कित्ता कायम ठेवला.
अखेर आपल्याच खात्यातील महिला कॉन्स्टेबलकडून एका प्रकरणात 95 हजारांची लाच घेताना त्यांना बुधवारी अटक करण्यात आली. या अटकेदरम्यान शेळके पोलिसांच्या ताब्यातून सुटून पळून गेले होते. मात्र,पोलिसांनी पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या.
गुरुवारी न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून शेळके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला पाठवण्यात आला होता.
या प्रस्तावानंतर शुक्रवारी कारवाई करण्यात आली आहे.









