प्रतिनिधी / धाराशिव
आभाळाकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देत वरुणराजाने रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात हजेरी लावली. तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासात जिल्ह्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास खरिपाच्या पेरण्या सुरू होऊ शकतात.
पावसाअभावी जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत. महिना उलटला तरी पाऊस नसल्याने खरीपाचे काय होणार अशी चिंता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. पावसाचे ढग दाटून येत होते मात्र वादळाने पाऊस पडत नव्हता.हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात पर्जन्यवृष्टी सुरू झाली. भिज पाऊस सुरू झाल्याने पेरणीयोग्य वातावरण निर्माण होऊ लागले आहे. धाराशिव शहरासह ग्रामीण भागात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.