आरंभ मराठी / धाराशिव
खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा काळाबाजार करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. खतांचा अवैध साठा करून तुटवडा असल्याचे दाखवून चढ्या दराने विक्री करण्याचे प्रकार पेरणीच्या कालावधीत घडतात. असाच साठा करून ठेवलेल्या ठिकाणावर छापा टाकून कृषी विभागाने कारवाई केली असून, अनधिकृत रासायनिक खतांचा 20 टन साठा जप्त करण्यात आला आहे.
कृषी विभागाने ही मोठी कारवाई केली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडमध्ये विनापरवाना 456 पोते रासायनिक खत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. कृषी विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी धाड टाकून पाहणी केली असता, जवळपास 20 टन रासायनिक खतांचा अवैधपणे साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खताची एकूण किंमत 4 लाख 61 हजार रुपये असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. खताच्या अवैध साठ्यावर कारवाई केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी दिली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला असताना अशा प्रकारे अवैधपणे साठवलेला रासायनिक खतांचा साठा हाती लागल्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या ऊसाला खत टाकण्यासाठी खताची मागणी वाढलेली आहे. त्यातच खरीप हंगामाची तयारी म्हणून शेतकरी रासायनिक खतांची विचारपूस करत आहेत. जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामाची तयारी केली असून, अवैध आणि बोगस खतांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात 9 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही भरारी पथके तालुका पातळीवर सक्रिय आहेत. शेतकऱ्यांनी खते, बियाणे व कृषी निविष्टा खरेदी करताना पावती घ्यावी. खते, बियाणे व कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाकडे अथवा पंचायत समिती कृषी विभागाकडे तक्रार द्यावी, असे आवाहनही कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.