आरंभ मराठी / तुळजापूर
राज्यभर गाजत असलेल्या बहुचर्चित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात फरार असलेल्या २२ संशयीत आरोपी मधील एकास पोलिसांकडून अखेर दीड महिन्यांनी अटक केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या फरार संशयित आरोपीचे नाव रणजीत पाटील असून त्याला बार्शी परिसरातून पोलिसांनी गुरुवारी (दि.१) अटक केली आहे. दरम्यान त्याला न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ड्रग्ज प्रकरणामुळे काल झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्याच्या उपस्थितीत खासदार ओमराजे व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात मोठा भडका उडालेला पाहायला मिळला होता. अजूनही ड्रग्ज प्रकरणातील २२ संशयीत आरोपी फरार असल्याने ओमराजे यांनी जोरदार आक्षेप घेतला होता.
दरम्यान या प्रकरणी पालकमंत्र्यांनी कोणीही असला तरी त्याची गय केली जाणार नसल्याचे सांगून पोलिसांना याबाबत तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यातच आता पोलिसांनी एका संशयीत आरोपीला अटक केल्याने उर्वरित २१ फरार आरोपीच्या बाबतीतही पोलीस कठोर कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत ३६ संशयित आरोपी पोलिसांनी निष्पन्न केले असून, त्यामधील १५ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यातील १४ आरोपी न्यायालय कोठडीत असून १ आरोपी पोलीस कोठडीत आहे. आणखी २१ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख आणि तामलवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.