तुळजापुरात व्यसनाची समस्या जुनीच, छत्रपती रामराजेंच्या आदेशावरून नानासाहेब पेशव्यांनी १ एप्रिल १७६० मध्ये केली होती दारूबंदी, आताही कठोर निर्णय घेण्याची गरज
चंद्रसेन देशमुख | आरंभ मराठी
धाराशिव : तीर्थक्षेत्र तुळजापुरात व्यसनाची समस्या जुनीच आहे. आता त्यात ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांची भर पडली आहे. वर्षानुवर्षे असलेली ही समस्या संपविण्यासाठी तत्कालिन परिस्थितीत छत्रपती रामराजे यांनी नानासाहेब पेशव्यांना आदेश देऊन दारूबंदी लागू केली होती.
वर्तमानातील समस्येवरून मात्र राजकारण सुरू आहे.गंभीर असलेली ही सामाजिक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असताना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. व्यसनाधीनता संपवून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी पुजाऱ्यांसह राज्यकर्त्यांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची तुळजापूर नगरी सध्या ड्रग्स प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत आहे. यात पुजाऱ्यांची बदनामी होत असल्याने संतापाची भावना आहे. त्यावरून राजकारणही तापले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आजवर दारू, गांजासारख्या पदार्थांचे सेवन करणारी नवी पिढी ड्रग्ससारख्या अंमली पदार्थांच्या सेवनात अडकत चालली असून, त्यामुळे चिंता वाढली आहे. तुळजापूरमध्ये व्यसनाधीनतेची समस्या जुनीच आहे.
त्यामुळेच ही बाब लक्षात घेऊन छत्रपती रामराजे यांनी १ एप्रिल १७६० रोजी दारूबंदीचा निर्णय घेतला होता. त्यांच्या आदेशानुसार नानासाहेब पेशव्यांनी तुळजापूरच्या तत्कालीन कारभाऱ्यांना आदेश देऊन चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान दारूबंदीचे फर्मान काढले होते.या निर्णयाला २६५ वर्षे झाली आहेत.
तत्कालीन परिस्थितीत तुळजापूरमध्ये दारूचा अतिरेकी वापर होता, हे या आदेशावरून अधोरेखित होते. त्यानंतर १० वर्षांपूर्वी म्हणजे २१ जून २०१५ रोजी तुळजापूर नगर पालिकेने पुन्हा एकदा दारूबंदीचा ठराव घेऊन शहरातील व्यसनाधीनता कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र,या ठरावानंतर तुळजापुरात दारूबंदीच्या दृष्टीने कुठलीही पावले पडली नाहीत.
किंबहुना पालिकेलाही या ठरावाचा विसर पडला आहे. शहरात व्यसनाधीनता कायम असून, आता ड्रग्ससारख्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे या समस्येत नवी भर पडली आहे. सद्यस्थितीत या मुद्यावरून राजकारण सुरू झाले असून, त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला पडत आहे. तीर्थक्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी सुरू असलेली व्यसनाधीनता संपविण्यासाठी सगळ्यांनी एकजूट दाखवून कठोर पावले उचलण्याची गरज सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.
सामाजिक भान हवे,
छत्रपती रामराजे यांना १७४५ ते १७५० या पाच वर्षांच्या कालावधीत तुळजापुरात राहावे लागले होते. या काळात त्यांचा सांभाळ तुळजापुरातील नारोजी भुते यांनी केला. रामराजे यांनी तुळजापुरातील व्यसनाधीनतेचे जवळून अवलोकन केले होते. त्यामुळे त्यांनी दारूबंदीचे आदेश दिले.सामाजिक परिस्थिती बिघडत असताना राज्यकर्त्यांनी डोळसपणे परिस्थिती पाहून कटू निर्णय घेण्याची गरज असते.
-डॉ. सतीश कदम, इतिहासाचे अभ्यासक, तुळजापूर
दारूबंदीसंदर्भातील पेशव्यांच्या पत्रात काय म्हटले होते ?
नानासाहेब पेशव्यांनी गोपाळराव गोविंद यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की ‘तुळजापूर चाकर व जानबा (तुळजापूरचे निझामाचे जहागीरदार रावरंभा निंबाळकर) सर्वांची दक्षिणा घेतात ते जानबा जवळून सोडवावी, पंढरपुरासारिखे सर्व देवांपुढील दक्षिणा जमा करून जामदारखाना करावा. कर घेऊच नये. तेथे मद्याचा प्रघात तो उत्तम नाही, दप्तरातील भाग ४० मध्ये (पृष्ठ क्रमांक १२६) पत्र क्रमांक १३२ (दि.१ एप्रिल १७६०) सदरील संदर्भ आहे. पुढे काही वर्षे दारूबंदी होती, असे सांगण्यात येते.