आरंभ मराठी / धाराशिव
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला असून, त्यांना हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याच्या मागणीसाठी उद्या बुधवारी (दि.५) धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद आज करण्याचे सर्व संघटनांनी घोषित केले होते. मात्र अचानक बंद घोषित केल्यामुळे विद्यार्थी, व्यापारी, महिला यांची गैरसोय होऊ शकते हे लक्षात आल्यामुळे आता हा बंद आजऐवजी उद्या करण्यात येणार आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडीओ काल समोर आल्यानंतर जनक्षोभ उसळला आहे. काल या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर यातील आरोपींविरोधात तीव्र भावना जनमाणसातून व्यक्त होत आहेत. ९ डिसेंबर महिन्यात संतोष देशमुख यांची पवनचक्की खंडणी प्रकरणातून निर्घृण हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा आज राजीनामा घेण्यात आला आहे. मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचा या प्रकरणात हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय त्यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड हा हत्येचा मुख्य सूत्रधार असून, त्याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुंडे यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनीही केली आहे.
त्यामुळे मराठा समाजासह विविध स्तरातून अशीच मागणी होत नाही.
या मागणीसाठी धाराशिवमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. बुधवारी जिल्हा बंदची हाक देण्यात आले असून, त्यात मुंडेंच्या चौकशीची मागणी केली जाणार आहे.धाराशिव जिल्ह्यातील सर्व संघटनांतर्फे उद्या जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
नराधमाच्या क्रौर्याचा निषेध करण्यासाठी या बंदचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सर्व जातीधर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करावा असे आवाहन करण्यात आले आहे.