दुचाकींना दंड, पण बेदरकर धावणाऱ्या टिप्परसारख्या वाहनांना मुभा कशासाठी ?
गाड्यांना पार्किंगसाठी जागा नाहीत, मग दंडाचा भार किती देणार ?
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव –
धाराशिव शहरातील वाहतूक पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून धडक कारवाई सुरू केली असून, या कारवाईमुळे वाहन चालक मात्र बेजार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गेल्या तीन महिन्यात वाहतूक पोलिसांनी तब्बल पावणे दोन कोटी रुपये दंड वाहन चालकांकडून वसूल केला आहे.
या तीन महिन्यात २४ हजार कारवाया करून हा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील चौकाचौकात वाहतूक पोलीस तैनात असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या नियमांवर बोट ठेवून वाहन चालकांवर कार्यवाही केली जात आहे. शहरात सुविधांचा अभाव असताना वाहतूक पोलिसांकडून मात्र नियमांवर बोट ठेवून कारवाई केली जात आहे.
शहरातील वाहतुकीला शिस्त असायला हवी हे खरेच आहे. परंतु, शहरात सुविधांचा अभाव असताना नियमांवर बोट ठेवत वाहनधारकांकडून दंडवसूली केली जात असल्यामुळे वाहनचालक बेजार झाल्याचे चित्र धाराशिव शहरात दिसत आहे.
सध्या शहरातील वाहनधारकांना वाहतूक पोलिसांचा विचित्र अनुभव येत आहे. वाहतूक पोलिसांचे दंड वसुलीचे उद्दिष्ट वाढल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून कारवायांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परिणामी वाहनधारकांच्या खिशाला रोज लाखो रुपयांची कात्री लागत आहे. सध्या धाराशिव शहरात प्रत्येक चौकात तीन ते चार वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. येणाऱ्या प्रत्येक दुचाकीला अडवून वेगवेगळ्या वाहतूक नियमांवर बोट ठेवून त्यांच्यावर कार्यवाही केली जात आहे.
यामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला दिवसाचे टार्गेट दिले असून, काहीही करून वाहन चालकांवर कारवाया करायच्याच असा नियम वरिष्ठांनी लागू केला असल्याचे समजते. त्यामुळे मागच्या तीन महिन्यात तब्बल २४ हजार वाहन चालकांवर कारवाया करून जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला आहे.
वाढत्या वाहन संख्येच्या तुलनेत धाराशिव शहरात रस्ते आणि पार्किंगच्या सुविधा अपुऱ्या आहेत. शहरातील सिग्नल व्यवस्था कोलमडली आहे.
मार्गदर्शक फलक, सूचना फलकांचा अभाव आहे. अपघातांचा धोका टाळण्यासाठी आणि वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी शिस्त गरजेची आहे हे खरे असले तरी ही शिस्त फक्त दुचाकी चालकांनाच का? असा सवाल वाहन चालकांकडून विचारला जात आहे. वाहतूक पोलिसांकडून चारचाकी गाड्या, मालवाहतूक गाड्या, टिप्पर यांच्यावर कारवाई केली जात नाही.
शहरातून भरधाव वेगाने ओव्हरलोडेल टिप्पर जात असताना वाहतूक पोलिसांकडून त्यांना रोखले जात नाही किंवा नंबर घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र दुचाकी चालकांवर ठरवून कारवाई केली जात असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. सध्या दररोज सरासरी दोनशे कारवाया करून दोन लाखांच्या आसपास दंड वसूल केला जात आहे. काही वेळा दिवसाला चारशे कारवाया करून साडेतीन लाखांपेक्षा अधिकचा दंड एकाच दिवसात वसूल केल्याचे देखील आकडेवारीवरून दिसत आहे. शहरात एकाही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसताना घराबाहेर पडलेल्या वाहनचालकाने आपली दुचाकी कोठे लावायची हे वाहतूक पोलिसांनीच सांगावे असा सवाल चालकांकडून विचारला जात आहे.
शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रणच नाही –
वाहतूक पोलिसांकडून एकीकडे नियमांवर बोट ठेवून कारवाई केली जात आहे. परंतु, दुसरीकडे मात्र वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळच्या सुमारास वाहतूक कोंडीचा सामना करत मार्ग काढावा लागतो. परंतु, चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस मात्र फक्त कारवाया करण्यात मग्न असतात.
बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई नाहीच –
बस स्थानकाच्या समोर बेशिस्त उभ्या केलेल्या रिक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. एसटी बस चालकांना देखील बस स्थानकात जाण्या – येण्यासाठी कसरत करावी लागते. त्यावेळी मात्र वाहतूक पोलिसांकडून नियमांवर बोट ठेवून कारवाई केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हा न्यायालय परिसर या भागातील वाहतूक कोंडीवर वाहतूक पोलिसांना आणखी मार्ग काढता आलेला नाही. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांनी अपयश येत असताना वसुली मात्र जोरात सुरु असल्याचे दिसते.
२२ नोव्हेंबर ते २० फेब्रुवारी दरम्यान केलेल्या कारवाया – २४ हजार १४२
वसूल केलेला दंड – १ कोटी ७६ लाख