अर्ज मागे घेण्याची मुदत संपली; चारही मतदारसंघात होणार चुरशीचा सामना
आरंभ मराठी / धाराशिव
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत तीन वाजता संपली असून, जिल्ह्यातील चारही मतदार संघात बंडोबांना थंड करण्यात युती आणि आघाडीला बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे. मागील चार दिवसांपासून बंडाचे निशाण फडकवणाऱ्या नेत्यांना समजावण्यातच प्रमुख उमेदवारांची दिवाळी गेली. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच मोठ्या घडामोडी घडतील हे अपेक्षित होते.
त्याप्रमाणे आज सकाळपासूनच चारही मतदार संघातील कोणते उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. जरांगे पाटील यांनी आज सकाळीच निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर मतदार संघातील उमेदवारांनी सकाळपासूनच अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली होती. तीन वाजेपर्यंत चारही मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या प्रमुख उमेदवारांनी आपापले अर्ज मागे घेतले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चार मतदार संघात या उमेदवारांनी माघार घेतली आहे.
धाराशिवमध्ये होती सर्वाधिक नाराजी
धाराशिव-कळंब – धाराशिव-कळंब मतदार संघातून शिवसेनेचे शिवाजी कापसे, सुरज साळुंखे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे मकरंद राजे निंबाळकर, सुधीर पाटील, अपक्ष उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आपापले अर्ज तीन वाजण्यापूर्वी मागे घेतले. युती आणि आघाडीकडून एकही बंडखोर मैदानात नसल्यामुळे या जागेवर शिवसेना (उबाठा) पक्षाचे कैलास पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अजित पिंगळे यांच्यातच थेट लढत होणार आहे.
तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या नेत्यांची आश्चर्यकारकरित्या माघार
तुळजापूर मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झाल्यामुळे हा मतदारसंघ पहिल्यापासून चर्चेत होता. या जागेवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. चव्हाण यांनी कालपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली होती. परंतु आज अखेरच्या दिवशी चव्हाण यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश आले. काँग्रेस हायकमांडकडून चव्हाण यांची समजूत घातल्याचे समजते. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अशोक जगदाळे यांनी तीन महिन्यांपासून प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे मागील निवडणुकी प्रमाणे याही वेळी जगदाळे हे अपक्ष उमेदवार म्हणून कायम राहतील असे वाटत होते.परंतु अखेरच्या क्षणी अशोक जगदाळे यांनीही आपला अर्ज मागे घेतला. राष्ट्रवादी कडून अर्ज दाखल करणाऱ्या जीवनराव गोरे यांनीही त्यांचा अर्ज मागे घेतला. इतर उमेदवारांमध्ये ॲड.व्यंकटराव गुंड, ऋषिकेश मगर, मुकुंद डोंगरे,संजय निंबाळकर यांनी अर्ज मागे घेतले.या ठिकाण जरांगे पाटील यांच्याकडून अनेकजण इच्छुक होते. त्यामध्ये सज्जनराव साळुंके, महंत तुकोजी बुवा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले. तुळजापूर जागेवर आता महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार राणाजगजितसिंग पाटील आणि काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यात थेट सामना होईल. वंचितकडून या जागेवर डॉ. स्नेहा सोनकाटे या देखील असतील. परंतु या ठिकाणी प्रमुख सामना पाटील विरुद्ध पाटील असाच होईल.समाजवादी पक्षाच्या वतीने देवानंद रोचकरी मैदानात असल्याने इथे तिरंगी सामना होऊ शकतो.
भूम-परंडा-वाशीतून शिवसेना उबाठा गटाची माघार,मोटेंचा मार्ग सुकर
या मतदार संघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि शिवसेना (उबाठा) पक्ष यांच्यात गडबड झाली होती. सुरुवातीपासून राष्ट्रवादी कडून इच्छुक असणारे राहुल मोटे यांची उमेदवारी अंतिम मानली जात असताना शिवसेना पक्षाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना शिवसेनेने अधिकृत एबी फॉर्म दिला होता. अखेरच्या क्षणापर्यंत उत्कंठा ताणली गेली असताना रणजित पाटील यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश पक्षश्रेष्ठीनी दिला.
त्यामुळे तीन वाजण्यास काही मिनिटांचा वेळ असताना रणजित पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. जरांगे पाटील यांच्याकडून इच्छुक असणारे प्रशांत चेडे यांनीही त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे या जागेवर शिवसेनेचे डॉ. तानाजीराव सावंत आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांच्यातच अटीतटीची लढत होईल.रणजित पाटील यांच्या उमेदवारीमुळे मोटेंची अडचण वाढली होती. मात्र आता त्यांचा मार्ग सोपा झाला आहे.
उमरगा-लोहारामध्ये सातलिंग स्वामी कुणाची अडचण वाढवणार ?
उमरगा-लोहारा या मतदार संघात विद्यमान आमदार शिवसेना पक्षाचे ज्ञानराज चौगुले आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रवीण स्वामी यांच्यातच प्रमुख सामना होईल. आज अपक्ष अर्ज दाखल केलेले कैलास शिंदे, उबाठा गटाचे विलास व्हटकर, पांडुरंग काळे यांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या सातलींग स्वामी यांनी मात्र त्यांचा अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे सातलींग स्वामी यांचा फटका महायुती की महाविकास आघाडी यांना बसतो हे पहावे लागेल. परंतु, या ठिकाणी प्रमुख लढत ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांच्यातच होईल.