तुळजापूर तालुक्यात काँग्रेसमध्ये उभी फूट, दोन्ही इच्छूक नेत्यांमध्ये चुरस, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर ; एक तालुका, एक पक्ष आणि वेळही एकच. पण मेळावे दोन.. होय तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अशीच अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे. माजी मंत्री मधुकर चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यात विधानसभेसाठी प्रचंड स्पर्धा वाढली असून, दोघेही तालुक्यात आणि मतदारसंघात स्वतंत्र मेळावे आयोजित करत आहेत. दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जात नाहीत, किंबहुना आता तर एकाच वेळी स्वतंत्र मेळावे आयोजित करून एकमेकांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज म्हणजे रविवारी सायंकाळी पाच वाजता मधुकर चव्हाण यांनी मंगरूळ येथे तर धीरज पाटील यांनी नळदुर्ग येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे नेमकं कोणाच्या मेळाव्याला उपस्थित राहायचे, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.एवढेच नाही तर पक्षात वाढलेला अंतर्गत संघर्ष पक्षाला कुठे घेऊन जाणार,असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे.
विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. इच्छुक उमेदवार तयारीला लागले असून, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण तर जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे दोघेही इच्छुक आहेत. त्यामुळे दोघांनीही तयारी सुरू केली आहे.मात्र, गेल्या काही दिवसापासून काँग्रेसमध्ये दोन गट पडले असल्याचे दिसून येत आहे. रविवार, 29 सप्टेंबर रोजी मधुकरराव चव्हाण यांनी मंगरूळ येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे तर धीरज पाटील यांनी नळदुर्ग येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन मेळावे आणि तेही एकाच वेळी होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. यातून दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये असलेली गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
जागावाटप लांबच, स्पर्धा का वाढली ?
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. शेकापचा काही काळ वगळता या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. 2019 साली मधुकरराव चव्हाण यांचा पराभव झाल्यानंतर ते प्रकृतीच्या कारणांनी तालुक्याच्या राजकारणातून थोडेसे बाजूला झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यानंतर मधुकरराव चव्हाण हे देखील भाजपमध्ये जाणार अशी चर्चा उठली होती. मात्र चव्हाण यांनी आपण कायमस्वरूपी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट करत 2024 ची विधानसभा लढवण्याची घोषणा केली तर 2012 पासून सलग दोन टर्म जिल्हा परिषद सदस्य त्यातील अडीच वर्षे जिल्हा परिषद अध्यक्ष तर सध्या जिल्हा काँग्रेस अध्यक्ष असलेले धीरज पाटील 2019 साली विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र त्यावेळी मधुकरराव चव्हाण यांनी बाजी मारली होती. धीरज पाटील यांचे वडील आप्पासाहेब पाटील हे जवळपास पंधरा वर्षे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले आहेत. पाटील घराण्यातील तीन पिढ्या काँग्रेसमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीपासून धीरज पाटील यांनी विधानसभेची तयारी सुरू केली होती.मात्र, मधुकर चव्हाण यांचा प्रदीर्घ अनुभव आणि त्यांना पक्षात तसेच मतदारसंघात मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांच्या उमेदवारीची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय 92 व्या वर्षीही ते अत्यंत धडाडीने मैदान गाजवू शकतात,असा विश्वास पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वाटतो. विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना शह देण्यासाठी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांना उमेदवारी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यांनी मला शेवटची संधी द्या,असे आवाहन करायला सुरूवात केली आहे. त्यांना विजयाची जणू खात्री आहे. मात्र अजून तिकीट वाटप तसेच महाविकास आघाडीत जागावाटप निश्चित झालेले नाही. अशा परिस्थितीत पक्षांतर्गत वाढलेली स्पर्धा पक्षाला कमकुवत करेल की बळ देईल,हे पाहणे महत्वाचे आहे.