अप्पर पोलीस अधीक्षक गौहर यांनी केली चर्चा, गुन्हा दाखल न झाल्याने आंदोलन व्यापक होणार
आरंभ मराठी/ धाराशिव
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेल्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या कार्यकर्त्यांची माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी रविवारी भेट घेतली. तसेच आंदोलकांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक हसन गौहर यांच्याशी गुन्हा दाखल करण्यासंबंधी चर्चा केली. मात्र, उपोषणकर्त्यांची मागणी मान्य न झाल्याने उपोषण कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किंबहुना सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिवप्रेमींनी सांगितले.
मालवण येथील पुतळा अतिशय निकृष्ट व बेडब बांधकामामुळे,अनुभव नसल्यामुळे आणि भ्रष्टाचार झाल्यामुळे हा पुतळा अत्यल्पकाळातच धाराशाही झालेला आहे.आजपर्यंत संपूर्ण भारतात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमिनीवर कोसळलेला नाही.अगदी शंभर शंभर वर्षांपूर्वीचे सुद्धा पुतळे सुस्थितीत असताना हा पुतळा जमिनीवर कोसळणे म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा जगात अपमान झाल्याने देशाची मान शरमेनी खाली झुकली आहे, असे आंदोलक शिवप्रेमींनी म्हटले आहे.
भारतातील तमाम शिवभक्त शिवप्रेमी तसेच राष्ट्रप्रेमी जनतेत असंतोषाची प्रचंड अशी लाट निर्माण झालेली आहे.याच संतप्त भावनांना वाट करून देण्यासाठी तसेच या घटनेस जबाबदार संबंधितांवर ताबडतोब धाराशिव येथे गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ गजाआड करावे. या संपूर्ण घटनेची जबाबदारी म्हणून राजकीय शासकीय व प्रशासकीय उच्चपदस्थानी याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या घटनात्मक पदावरून पाय उतार व्हावे, यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने 4 सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्मराज सूर्यवंशी, अमोल सिरसट, दत्तात्रेय जावळे, योगेश आतकरे, सतीश थोरात यांनी आत्मक्लेष आमरण उपोषण सुरू केले आहे. धर्मराज सूर्यवंशी, अमोल सिरसाट यांची प्रकृती बिघडली आहे.दरम्यान, जिल्हा दौऱ्यावर आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांनी रविवारी सायंकाळी उपोषण कर्त्याची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक हसन गौहर यांच्याशीही चर्चा केली. मात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आंदोलकांनी उपोषण कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.