मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक, आमदार राणा पाटील यांची माहिती
आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून, या पार्श्वभूमीवर आरक्षणावर सरकारने तातडीने तोडगा काढावा, यासाठी राज्यातील लोकप्रतिनिधींकडून दबाव वाढला आहे. दोन दिवसांपासून राज्यातील लोकप्रतिनिधींकडून मनोज पाटील यांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. दरम्यान, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी सायंकाळी भेट घेऊन मनोज पाटील यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, सगे सोयऱ्यांचा आदेश तातडीने काढावा, अशी मागणी केली. तसेच मनोज पाटील यांच्याशी मागण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राज्यातील मंत्रिमंडळाच्या सदस्यांना पाठविण्याची विनंती केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून गुरुवारी सरकारचे शिष्टमंडळ मनोज पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीला जात आहे. या शिष्टमंडळात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने मराठा समाजात सरकारविरुद्ध असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून जरांगे पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या अंतरवाली सराटीकडे चकरा वाढल्या आहेत. कालच मराठवाड्यातील विविध लोकप्रतिनिधींनी मनोज पाटील यांची भेट घेऊन पाठिंबा दिला तसेच सरकारने यासंदर्भात तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली. तुळजापूरचे भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील तसेच औसा येथील आमदार अभिमन्यू पवार यांनी बुधवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन जरांगे पाटील यांच्या मागणीवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली तसेच जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार सगे सोयऱ्यांचा शासन निर्णय निर्गमित करावा, न्यायालयात टिकणारे आरक्षण जाहीर करावे, तोडगा काढण्यासाठी राज्यातील मंत्रिमंडळ सदस्यांना मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पाठवावे, अशी विनंती केली. दरम्यान त्यांच्या या विनंतीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ सदस्यांना अंतरवाली सराटीला पाठवणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार आज राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अंतरवाली सराटीला मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी जात आहेत.यामध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा समावेश आहे.
आमदार राणा पाटील म्हणाले,मुख्यमंत्री सकारात्मक
मराठा संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या अनुषंगाने ‘सगे सोयऱ्यांचा’ शासन निर्णय (GR) काढण्यासह इतर महत्त्वपूर्ण मुद्यांच्या संदर्भाने काल रात्री मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी तातडीने मंत्रिमंडळातील सदस्यांना पाठवण्यासंदर्भात विनंती करण्यात आली.
न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी आवश्यक औपचारिकता जलदगतीने पूर्ण होत असतानाच, काही तातडीचे निर्णय घेण्याविषयी सरकार सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सरकार उपोषणासंदर्भात संवेदनशील असून आजच शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ सदस्यांसह मी मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन सरकारच्या भूमिकेविषयी अवगत करणार आहे.












