दुष्काळाच्या झळा सुरू, पाणी टंचाईसोबतच पशूधनासाठी चाऱ्याची समस्या,शेतकरी हवालदिल, जिल्ह्यातील साडे पाच लाख पशुधनाचा प्रश्न
सज्जन यादव / आरंभ मराठी
धाराशिव जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनाने धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी धाराशिव, वाशी आणि लोहारा या तीन तालुक्यातच दुष्काळ जाहीर केला आहे.मात्र, ईतर पाच तालुक्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तरीही इतर पाच तालुक्यांना टंचाईग्रस्त या श्रेणीत टाकलेले आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चारा मिळत नसल्याने व मिळणारा चारा जादा भावाने विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.त्यामुळे सर्वच आठही तालुक्यात उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. अनेक शेतकरी त्यांच्याजवळ असणारी जनावरे मातीमोल किंमतीने विकत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील पाण्याचे सर्व प्रकल्प एप्रिल महिन्यातच कोरडेठाक पडण्याची शक्यता आहे. सध्या उपलब्ध असणारे पाणी माणसांसाठी आणि जनावरांसाठी राखीव ठेवले आहे. परंतु मार्च महिन्यातच पारा चाळीशीच्या जवळ गेल्यामुळे आहे तो पाणीसाठा बाष्पीभवनामुळे संपतो की काय याची चिंता शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे जनावरांचा सांभाळ कसा करायचा, अशा चिंतेत शेतकरीवर्ग सापडला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेती पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. खरिपातील सोयाबीन पिकाशिवाय दुसरे कोणतेच नगदी पीक जिल्ह्यात पाण्याअभावी घेता येत नाही. त्यामुळे येथील शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळला आहे. येथील शेतकरी गाई, म्हशी आणि संकरीत गाईचे पालन करून दूध व्यवसाय करतात. परंतु, सध्या दुधाला कवडीमोल भाव आहे. त्यातच जनावरांच्या खाद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी वर्गाला या दुभत्या जनावरांना सांभाळणे अवघड झाले आहे. पाणी नसल्यामुळे जनावरांना हिरवा चारा देणे शक्य नाही. फक्त कडबा किंवा इतर कोरड्या चाऱ्यावर दुभत्या जनावरांचे संगोपन करणे अवघड आहे. त्यामुळे या दुष्काळाचा फटका दुग्ध्यवसायाला बसला आहे. कडवळ व पेंडीचे दर गगनाला भिडले आहेत. चारा-पाण्याच्या टंचाईमुळे अनेक शेतकरी जनावरे विक्री करण्याच्या मार्गावर आहेत. मार्च महिन्यातच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. या उन्हामुळे दूध देणाऱ्या जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यातच दुधाचे भाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांसाठी जनावरे सांभाळणे कठीण होऊन बसले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पशुधन
धाराशिव जिल्ह्यात 3,62422 गाई आहेत. तर म्हशींची संख्या 1,86902 एवढी आहे. जिल्ह्यातील एकूण पशुधन 5,49324 एवढे आहे.
–
दुष्काळग्रस्त ३ तालुक्यातील पशुधन
धाराशिव -गाई -49,870
म्हशी – 41,705
वाशी – गाई – 33,808
म्हशी – 8,217
लोहारा- गाई – 23,511
म्हशी – 16,809
पशुखाद्याचे दर आवाक्याबाहेर,
एकीकडे चाऱ्याचे आणि पाण्याचे संकट गंभीर असताना पशुखाद्याचे दर सुद्धा गगनाला भिडलेले आहेत.
–
पशुखाद्याचे दर
खपरी पेंड २६०० रुपये ते २७०० रुपये ५० किलोचे पोते, सरकी १२०० रुपये पोते, गोळी पेंड १७०० रुपये पोते, मुसा १४०० रुपये पोते, पेंडीचे भाव वाढले आहेत. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दुधाच्या पैशातील मोठा हिस्सा पशुखाद्य आणि चारा खरेदी करण्यातच जात आहे.