8 तारखेच्या घटनेची आनंद नगर पोलिसात नोंद,वडिलांची तक्रार
आरंभ मराठी / धाराशिव
बांधकामाचे पैसे न देता सातत्याने मानसिक त्रास दिल्यामुळे तरुणाने आत्महत्या केली असून, तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उबाठा गटाच्या युवा सेनेचा जिल्हाप्रमुख आणि विभागीय सचिव अक्षय संजय ढोबळे याच्यावर आनंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल किरदत्त, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने ढोबळे कॉम्प्लेक्स येथे काम केले होते. त्याने कॉम्प्लेक्स येथे एका खोलीत 8 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
राहुल श्रीरंग किरदत्त (३३) हा मूळचा आळणी येथील होता.तो धाराशिव शहरात व्यवसाय करत होता. व्यवसाय मोडीत निघाल्यानंतर त्याने अक्षय ढोबळे याच्याकडे बांधकामावर काम केले होते. त्याच्या या कामाचे पैसे न दिल्यामुळे तो निराश होता.यातून त्याने 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 16.00 ते 16.30 ते 10.02.2024 रोजी 10.00 वाजेच्या दरम्यान शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथील ढोबळे कॉम्पलेक्स येथे गळफास घेवून आत्महत्या केली. राहुल किरदत्त यांना बॅकेची नोटीस आल्याने आरोपी अक्षय संजय ढोबळे (रा.आनंदनगर) यांना कॉम्पलेक्सच्या बांधकामावरील कामाचे पैसे मागितले असता ढोबळे याने पैसे देण्यास टाळाटाळ करुन नेहमी वाद विवाद घालून मानसिक त्रास दिल्याने ढोबळे याच्या जाचास व त्रासास कंटाळून राहुल किरदत्त यांनी आत्महत्या केल्याची तक्रार राहुल याचे वडील श्रीरंग भगवान किरदत्त ( 65 वर्षे, रा. दत्तनगर धाराशिव) यांनी 28 फेब्रुवारी रोजी दिली.याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात अक्षय ढोबळे याच्याविरोधात भा.दं.वि. सं. कलम-306 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बांधकाम प्रकरणातही कारवाई
अक्षय ढोबळे युवा सेनेचा पदाधिकारी असल्याने तो पदाचा दुरुपयोग करून दडपशाही करत होता,अशा तक्रारी आहेत.ओपन स्पेसमध्ये बांधकाम केल्याप्रकरणी त्याच्या घराच्या बांधकामात देखील अनेक तक्रारी दाखल होत्या. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याचे नगरसेवक पदही रद्द झाले होते. पुढे त्याने कारवाईला स्थगिती मिळवली होती.