आमदार कैलास पाटील यांची माहिती, कृषी आयुक्तांच्या भेटीनंतर प्रक्रिया गतिमान
प्रतिनिधी / धाराशिव
२०२२ सालच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. मात्र, विमा कंपनीने भारांकनाचा निकष चुकीच्या पद्धतीने लावत ५० टक्केच भरपाई दिली. आमदार कैलास पाटील यांनी याबाबत विभागीय समितीकडे तक्रार केली होती तसेच गेल्या आठवड्यात कृषी आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांची भेट घेऊन विम्याची रक्कम मिळवून देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २५ जानेवारीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील,असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.
गेल्यावर्षी अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या १ लाख ३४ हजारांवर शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविल्या. याबाबत आमदार कैलास पाटील यांनी विभागीय समितीकडे स्वत: तक्रार केली होती. या समितीने संपूर्ण भरपाई तसेच पूर्वसूचनांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देतानाच पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. पुढे राज्य तांत्रिक सल्लागार समितीनेही हेच आदेश दिले. परंतु, कंपनी हे आदेश पाळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीच्या तीन नोटिसा दिल्या.
इतके होवूनही कंपनी दाद देत नसल्याने आमदार पाटील यांनी ३ जानेवारी रोजी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुणे येथे भेट घेतली होती व या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रलंबित २९४ कोटी रुपये मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
डॉ. प्रविण गेडाम यांनी यात लक्ष घातल्याने आठ दिवसातच याला गती मिळाली असून, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास कंपनी तयार असल्याचे लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी २५ जानेवारी पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश विमा कंपनीस निर्गमित केले आहेत. त्यामुळे २०२२ मधील प्रलंबित विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही विमा रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला विमा कंपनी व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील,असे आमदार पाटील यांनी सांगितले.