प्रतिनिधी / धाराशिव
आता नाही तर पुन्हा कधीच नाही, म्हणत मराठा आरक्षणासाठी मराठा समाज बांधवांनी मुंबईतील आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. आज शुक्रवारी कळंब शहरात नियोजनासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे तर उद्या शनिवारी दुपारी 4 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. जरांगे – पाटील यांनी यापूर्वी दोनवेळा आंदोलन करूनही सरकारने मराठा आरक्षण दिले नाही. त्यामुळे आता शेवटची लढाई म्हणत मनोज जरांगे -पाटील यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला असून, 26 जानेवारीपासून ते मुंबईत आमरण उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर 20 जानेवारीला ते समाज बांधवांना घेऊन मुंबईतील आंदोलनासाठी कूच करणार आहेत.त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो समाज बांधव त्यांच्या सोबतच्या या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या अभूतपूर्व आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात येत आहे.
मराठा समाजाच्या वतीने त्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. शुक्रवारी कळंब येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे तर शनिवारी दुपारी चार वाजता धाराशिव शहरात तालुका शिक्षक सहकारी सहकारी पतसंस्थेत (समता नगर) बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मुंबईतील आंदोलनाची माहिती तसेच पायी चालत जाताना मार्गावरील नियोजन यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.आता नाही तर पुन्हा कधीच नाही म्हणत समाज माध्यमावर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.