महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष
गणेश गायकवाड / तामलवाडी
एकीकडे खासगी वाहतुकीचे पर्याय खुले होत असताना एस टी महामंडळ आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करायला तयार नाही.तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी गावास गेल्या वीस वर्षांपासून एस.टी बससेवा बंद असून येथील नागरिकांचे प्रवासासाठी प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांचे तसेच विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
पांगरदरवाडी गावची लोकसंख्या जवळपास चार हजारच्यावर असून येथील नागरिक शासकीय व वैयक्तिक कामासाठी दैनंदिन तुळजापूरला जात असतात. तसेच गावातील शेकडो विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी तुळजापूरला जातात. मात्र, या गावास अद्यापही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस सेवा सुरु केली नाही. बस सेवा नसल्यामुळे अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. गत पंचेवीस वर्षांपूर्वी या गावास बससेवा सुरु होती. मात्र, एसटी महामंडळाने रस्ता खराब असल्यामुळे ही बससेवा बंद केली होती. पांगरदरवाडी गावास सकाळी दहा वाजता व सायंकाळी पाच वाजता स्वतंत्र बस फेरी सुरु करावी तसेच तुळजापूरहुन वडाळा (ता.जि.सोलापूर) या गावास जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व बस पांगरदरवाडी मार्गे सोडण्यात याव्या अशी मागणी पांगरदरवाडी येथील ग्रामस्थांनी तुळजापूर आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.