प्रतिनिधी / धाराशिव
राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,याचा प्रत्यय वारंवार येत असतो. काही टप्प्यावर राजकारणविरहीत माणुसकीची भावना महत्वाची असते. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत आणि परांड्यातील त्यांचे विरोधक तथा ठाकरे गटाचे नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामध्ये टोकाचा विरोध आहे. मात्र ज्ञानेश्वर पाटील काही दिवसापासून आजारी असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी खुद्द डॉ. सावंत रुग्णालयात गेले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालकमंत्री डॉ. सावंत यांनी गुरुवारी सकाळी त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली तसेच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
धाराशिवच्या राजकारणात वेगळा आदर्श
जिल्ह्याचे थोर नेते स्व.भाई उद्धवराव पाटील यांचा आदर्श वर्तमानातल्या राजकारण्यांनी घ्यायला हवा. भाई उद्धवराव दादांचे विरोधकही दादांचा कमालीचा आदर करत. एकदा लोकसभेच्या निवडणुकीत लोहारा भागातील कानेगाव येथील सभेला जाताना उद्धवराव दादांच्या विरोधक नेत्याची गाडी बंद पडली होती. तेंव्हा दादा त्याच भागात स्वतःच्या प्रचारासाठी जाताना त्यांना विरोधी उमेदवार थांबलेले दिसले. त्यांनी त्यांच्या सभेच्या ठिकाणी पोहोचून विरोधी उमेदवारासाठी आपली गाडी पाठवून दिली होती. असे अनेक आदर्श जिल्ह्याच्या राजकारणात नोंदलेले आहेत. त्यामुळे या इतिहासातून राजकारण्यांनी बोध घ्यायला हवा.