कु दर्शनाच्या हत्याकांडाने पुरता हादरून गेलो आहे. त्या सोबतच दर्शना विषयी समाजमाध्यमांवर अनेक लोक जसे व्यक्त होत आहेत हे तिच्यावर अन्याय करणारे आहे. माझ्या अनुभवावरून सांगतो ती संवेदनशील होती, हूशार आणि समजदारही होती. घरची जाण होती. आई-वडलांची चिंता होती. त्यांच्यासाठी काहीतरी करायचे होते तिला. ती भक्कम व कणखर होती. अधिकारी होण्याअगोदचा तिचा मला पाठवलेल्या मेलचा स्क्रिनशाॅट सोबत जोडतो आहे. त्यावरून ती कसा विचार करत होती ते पहा. निवड झाल्यावर तिला माझ्याकडून देखणा विठोबा हक्काने हवा होता. ती रोज ज्ञानेश्वरीही वाचायची,अशी भावना पुण्यातील पत्रकार सचिन पवार यांनी त्यांच्या सोशल माध्यमांवर व्यक्त केली आहे.
सचिन पवार म्हणतात, त्या दिवशी ती मित्रासोबत राजगडावर ट्रेकिंगसाठी गेली व तिथं घात झाला. तिचं ट्रेकींगला जाणं चुकीचं नाही. मित्रासोबत जाणं हे ही चुकीचं नाही. त्यानं तिला लग्नाची मागणी घालणं हे ही चुकीचं नाही. इथं पर्यंत कोणताही गुन्हा नाही. राहूलचं प्रेम एकतर्फी होतं. दर्शनाने नकार दिल्यावर राहूल मधला नराधम जागा झाला आणि त्यानं तिचा जीव घेतला. हा राहूलचा गुन्हा आहे. यात दर्शनाचा काय गुन्हा ?
आपण सर्वांनी तिला अप्रत्यक्ष गुन्हेगार ठरवणं, संस्काराच्या नावाखाली चारित्र्यहनन करणं बंद केलं पाहिजे. पुरूषी मानसिकतेतील गलिच्छ पोस्टी वाचल्यावर तिटकारा आला. बाईकडे आपण अधिक विवेकाने, समतेनं पहाण्याचं शिक्षण घ्यायची गरज आहे.