धाराशिवसह वाशी, शिराढोण, तेरखेड्यात कडकडीत बंद, भूम, वाशी, परांड्यात जोरदार घोषणाबाजी, तुळजापूर, उमरग्यातही तीव्र संताप
टीम आरंभ मराठी / धाराशिव
जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली असून, ठिकठिकाणी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. धाराशिव शहरात मराठा तरुणांनी निषेध फेरी काढून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. काही ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलांनी दगडफेक केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तातडीने दुकाने बंद करून आंदोलनात सहभाग नोंदवला. दरम्यान, कोरोनातील लॉकडाउननंतर प्रथमच जिल्ह्यातील बाजारपेठ पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.
वाशीमध्ये सरकारचा निषेध, समाजाकडून मोर्चा
विक्रांत उंदरे / वाशी
जालना जिल्ह्यातील अंतरावली गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (दि.२) वाशी शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव यांना निवेदन देण्यात आले.
अंतरावली सराटि या गावात मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सहकाऱ्यांसह उपोषणास बसले होते. पाटील यांची प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यासाठी गेलेले पोलिस आणि आंदोलनकर्ते यांच्यात शुक्रवारी (दि. १) संघर्ष झाला. यावेळी पोलिसांनी आंदोलनस्थळी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. यात मराठा समाजाचे अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शहर बंद पुकारण्यात आला. यावेळी स्वयंस्फूर्तीने व्यापारी बंद मध्ये सहभागी झाले व कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात लाठीचार्ज केलेल्या पोलिसांचे निलंबन करणे, मराठा समाजाला आरक्षण देणे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी प्रशांत चेडे, सुरेश कवडे, नागनाथ नाईकवाडी , सूर्यकांत मोळवणे, सूर्यकांत सांडसे , संभाजी भांडवले ,प्रशांत कवडे, राकेश उंदरे यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी ,सर्वपक्षीय व संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक शशी दुरुसकर यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखली.
शिराढोण बाजारपेठ कडकडीत बंद
अमोलसिंह चंदेल । शिराढोण
जालना येथील मराठा अंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्चच्या निषेधार्थ शिराढोण येथील मराठा बांधवानी व्यापा-यांनी गावबंदची हाक दिली होती. या गावबंद आंदोलनासाठी गावातील व्यापा-यांनी प्रतिसाद देत 100 टक्के बाजारपेठ बंद ठेवली आणि या घटनेचा निषेध केला. या गावबंद अंदोलनासोबतच गावातील मराठा बांधवानी येथील छत्रपती संभाजी चौकात शांततेत एकत्र येत घटनेसंदर्भात सर्वांना माहिती देवून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वांनी एकजूटीने राहण्याचा निश्चय केला.
तेरखेड्यात बाजारपेठ लॉकडाऊन
सचिन दराडे / तेरखेडा
जालना जिल्ह्यात मराठा समाजावर काल पोलिसांकडून झालेल्या लाठी चार्जचा निषेध नोंदवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडून तेरखेडा बंदची हाक देण्यात आली असून,त्यामुळे तेरखेडा आणि परिसरामध्ये बाजारपेठेत कडकडीत बंद करण्यात आली. कोरोनातील लॉकडाऊननंतर प्रथमच गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. तेरखेडा येथे दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. त्यात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र आज कोरोना काळात बंद झालेल्या बाजाराची प्रचिती तेरखेडामध्ये दिसून येत आहे. सर्व व्यापाऱ्यांनी आपली आपली दुकाने बंद ठेवून जालन्यातील घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यामुळे तेरखेडा गावामध्ये गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.