तुळजापूर विकास आराखड्याच्या प्रेझेंटेशननंतर कोणतीच कार्यवाही न झाल्याने तुळजापूरचा खरंच विकास होणार की आराखडा मृगजळ ठरणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता या विकास आराखड्यावर चर्चा होऊन शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.
प्रतिनिधी / तुळजापूर
एकीकडे राज्यातील अनेक छोट्या मोठ्या तिर्थक्षेत्राचा विकास होत असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या tuljabhavani temple मंदिर आणि परिसर विकास आराखड्याचा मंदिर संस्थान आणि लोकप्रतिनिधींना विसर पडला की काय असा प्रश्न भाविकांना पडला होता. कारण 6 महिन्यापेक्षा अधिक काळ लोटूनही तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी जात नव्हता. त्यामुळे ‘आरंभ मराठी’ने 9 ऑगस्ट रोजी यासंदर्भात खरंच तुळजापूरचा विकास होणार की मृगजळ ठरणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंदिर संस्थानने आता आराखड्यावर महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. उद्या 18 रोजी सकाळी तुळजापुरात तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात ही बैठक घेतली जाणार आहे.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाई नगरीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गेल्या वर्षी तुळजाभवानी मंदिर संस्थानने नव्याने तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी मुंबईतील एका कंपनीची निवड केली होती. या कंपनीने 3 महिन्यात अन्य मंदिरांचा अभ्यास करून तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे स्वरूप तयार करावे, असे अभिप्रेत होते. मंदिर संस्थानने यादरम्यान तिरुपती बालाजीसह वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देऊन पाहणी केली तसेच नियुक्त केलेल्या कंपनीला मंदिराच्या आराखड्याबद्दल सुधारणा सांगितल्या. त्यानंतर कंपनीने मंदिर संस्थानकडे 1 हजार कोटींचा आराखडा सादरही केला. आराखड्यात कोणकोणत्या बाबींचा अंतर्भाव असेल,याविषयीचे प्रेझेंटेशन मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले होते. मात्र पुढे आराखड्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. एकीकडे राज्यातील तिर्थक्षेत्राचा झपाट्याने विकास होत असताना तुळजापूर तिर्थक्षेत्राचा विकास ठप्प झाल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात आरंभ मराठी ने 9 ऑगस्ट रोजी खरंच विकास होणार की मृगजळ ठरणार तुळजापूरचा विकास आराखडा, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर विकास आराखड्याला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण यासंदर्भात 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंदिर संस्थानने आराखडा सादरीकरणासाठी बैठकीचे आयोजन केले असून, यात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह खासदार, सर्व आमदार, वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी, पुजारी मंडळ आणि तुळजापुरातील वेगवेगळ्या संस्था, संघटनांना निमंत्रित केले आहे. या बैठकीत विकास आराखड्यावर चर्चा होऊन आराखडा शासनाला सादर केला जाणार आहे.यादरम्यान विकासासंदर्भात भाविकांनी, निमंत्रितांनी सूचना मांडाव्यात असे आवाहन तुळजाभवानी मंदिराचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे. त्यामुळे आराखड्याला लवकर मूर्त स्वरूप यावे अशी भाविकांची अपेक्षा आहे.