जहीर इनामदार / नळदुर्ग
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरात नळाला आठ ते दहा दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. वास्तविक पाहता प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा असून, नागरिकांना पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसत आहे, ऐन उन्हाळ्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण होत असल्याने शहरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, पाणी पुरवठातील अनियमितिता दूर करून नियमित तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्याची मागणी शहरवासियांतून होत आहे.
बोरी धराणात सध्या मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे, मात्र पालिकेच्यावतीने शहरवासियांना आठ ते दहा -दहा दिवस पाणी पुरवठा होत नाही,धरण उशाला कोरड घशाला म्हणण्याची वेळ आली आहे, यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे, पालिकेच्या रेकार्डवर शहरात जवळपास अडीच डझन कुपनलिका आहेत मात्र यापैकी बोटावर मोजण्याइतकेच कुपनलिका सध्या सुरु आहेत ज्याचा आधार नागरिकांना मिळत आहेत, पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून नियमित तीन दिवसआड पाणी पुरवठा करून नागरिकांची सोय करण्याची मागणी होत आहे.
शाश्वत उपाय योजनाची गरज
शहराजवळील बोरी धरणात मुबल्लक पाणीसाठा असुनही जुन्या लहान जलवाहिन्या,कमी क्षमता असलेलं जलकुंभ यामुळे पालीकेतील यंत्रणा सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे म्हणणे आहे.
२५ वर्षाचे नियोजन हवे
वाढते नागरिकरण, वाढत्या वसत्या,यामुळे जुन्या जलवाहिन्या कुचकामी ठरत असल्याचा दावा पालिकेतर्फे करण्यात येत आहे,मात्र यावर कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्यासाठी येत्या २५ वर्षांचा विचार करून नवीन मोठया जलवाहिन्याचे जाळे अंथरणे, नवीन मोठे जलकुंभ बांधणे, यामुळे शहरवासियांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
नेहमीची समस्या
उन्हाळ्यासह ईद,सण-उत्सवांच्या काळातही आठ-दहा दिवस नळाना पाणी येत नसल्याने नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. निवडणूक होऊन नवीन सत्ता स्थापन करून पाणी पुरवठा संबंधित नवीन कामे हाती घेईपर्यंत सध्या पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये आडगळीला पडलेल्या कुपनलिकांची दुरुस्ती करावी,गरज असलेल्या ठिकाणी नवीन कुपनलिका खोदून पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनातून होत आहे.