शाम जाधवर । कळंब
आषाढी एकादशी आणि पंढरपूर म्हणजे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची याची देही याची डोळा जगण्याची आणि अनुभवण्याची वारी.
वारीला निघणारे भाविक आणि त्यांची मनोभावे सेवा करणारे सेवेकरी हे गणित संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळते. वारकर्यांची सेवा करण्यात आपला महाराष्ट्र धर्म जपणारे असंख्य भाविक आणि सेवेकरी आपण पावलोपावली अनुभवतो. भले आपण पंढरी च्या वारीला गेलो नाही परंतु वारकऱ्यांची सेवा करून आपणही पुण्य कमवू अशी प्रामाणिक आशा प्रत्येक सेवेकरी बाळगतो आणि आपापल्या परीने घडणारी सेवाही देतो.
वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र कोठेही कमी पडत नाही, परंतु आषाढी एकादशीची वारी संपली कि, सगळ्यांना या वारकर्यांचा विसर पडतो हेही खरे.
पंढरीच्या विठू रायाला भेटण्यासाठी पै-पै जमा करून निघालेला गरीब कष्टकरी वारकरी परतीच्या प्रवासात मात्र मिळेल त्या वाहनाने आणि उपाशीपोटी घर जवळ करण्याच्या प्रयत्नात असतो. भले खिशात पैसे कमी असतील, जाताना खाण्याची भ्रांत असेल, तरीही हा वारकरी उपाशी पोटी निघतो पण विठू रायाला भेटून झालेला आनंद त्याला पोटाची भूकही विसरायला भाग पाडतो.
खरी गोष्ट सुरु होते ते इथेच, कळंब मधील कथले आघाडी त्यांच्या आणि उपाशी पोटाच्या मध्ये येते. आषाढी वारी करून निघालेल्या या माउलींच्या प्रत्येक गाडीला कळंब मध्ये अडवले जाते, हक्काने त्यांना मोफत अन्नछत्रा कडे नेले जाते, आणि त्या परतीच्या प्रवास करणाऱ्या माउलींना पोट भरून जेऊ घालूनच परतीच्या प्रवासाला सोडले जाते.
गेली ३ वर्षे हा उपक्रम अवितरत सुरु आहे हे विशेष.
मागच्या वर्षी कमी पडलेल्या उणीवा लक्षात ठेवून त्यावर चांगले काम करून जास्तीत जास्त माउलींना म्हणजेच परतीच्या वारकऱ्यांना मोफत अन्न छत्र देण्याचे काम याही वर्षी अत्यंत उत्साहात पार पडले. गर्दीचा उचंक मोडत काढून या वर्षी चक्क ६० हजार वारकर्यांना परतीच्या प्रवासात मोफत अन्न छत्र देण्याचा अनोखा विक्रम कळंब मधील स्व. गणपतराव कथले आघाडीच्या वतीने करण्यात आला.
एवढ्या मोठ्या भाविकांना मोफत अन्न छत्र पुरवणे आणि त्यांची मनोभावे सेवा करणे एकट्या दुकट्याचे काम नक्कीच नाही.
यासाठी संपूर्ण कळंबकरानी खारीचा वाटा उचलला. डॉक्टर, वकील, शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, विध्यार्थी, सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, पत्रकार, राजकारणी असे असंख्य सेवेकरी आपले स्वतःचे काम असल्याप्रमाणे काम करत होते. कळंब मार्गाने जाणाऱ्या विदर्भ असो कि जालना, परळी, परभणी अशा विविध ठिकाणी वारकर्यांना घेऊन जाणाऱ्या ट्र्क, टेम्पो, बस अशा प्रत्येक वाहनाला हक्काने अडवून त्यांना पोटभर जेऊ घालूनच सोडले गेले. कळंब बस स्थानकामध्ये हा सोहळा पार पडला. पुरी भाजी, मसाला भात अशा खमंग आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊन प्रत्येक माउली आनंदाचा ढेकर देऊनच परतीच्या वाटेने मार्गस्थ झाली.
९ क्विंटल गहू, १० क्विंटल तांदूळ, ४ क्विंटल बटाटे, १५ किलोचे २० तेल डबे एवढी लागली सामुग्री
सकाळी ४ वाजता सुरु झालेला हा सेवेचा उपक्रम रात्री ८ वाजेपर्यंत अवितरत चालला
या अन्न छत्रा दरम्यान एक भावनिक गोष्टही घडली – पंढरीच्या विठुरायाला मन भरून पाहिलेल्या आणि या अन्नछत्रामुळे समाधानी झालेल्या २ वृद्ध महिला आयोजकाकांडे आल्या आणि आमच्यासाठी कळंब हे दुसरे पंढरपूर झाले आहे, तिथे गेल्यावरही पोटाची चिंता नाही आणि परतीच्या प्रवासातही तुमच्यामुळे काळजी नाही अशा भावना व्यक्त केल्या.