वाशी बाजार समिती: नवे कारभारी, देणार उभारी, पशुपालकांतून समाधान
विक्रांत उंदरे / वाशी
येथील मागील काही वर्षांपासून बंद पडलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु करण्यासाठी बाजार समितीच्या नव्या संचालक मंडळाने पुढाकार घेतला असून, सोमवारपासून (दि.२४) बाजार पूर्ववत सुरु होणार आहे. त्यासाठी बाजार समितीने सर्व तयारी केली असून, जनावरांच्या दाखला फीमध्ये बदल केले आहेत. शेळी-मेंढी १०, मोठी जनावरे ५० रुपये प्रति नग दाखला फी आकारली जाणार आहे. पाण्याचे हौद, जनावरांचे शेड यासह इतर मुलभूत सुविधाही बाजार समितीने उपलब्ध करून दिल्या आहेत.
नावलौकिक मिळवलेला असा एकेकाळीचा वाशी येथील जनावराचा आठवडी बाजार मागील कित्येक वर्षांपासून बंद पडला होता. सोयी सुविधांचा अभाव, जास्तीची कर आकारणी, राजकीय अनास्था आणि प्रशासकीय उदासिनता यामुळे बाजार बंद पडला होता. दोन महिन्यापूर्वी बाजार समितीची निवडणुक झाली. निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. नवनियुक्त संचालक मंडळाने पाहिल्याच बैठकीत बंद पडलेला जनावरांचा आठवडी बाजार चालू करण्यचा ठराव घेतला. पूर्वी वाशी येथे व्यापारासाठी येणारे व्यापारी यांच्यासह इतर ठिकाणच्या नावाजलेल्या जनावरांच्या बाजारातील नवीन व्यापार्याची भेटी संचालक मंडळाने घेतल्या आहेत. जनावराच्या आठवडी बाजाराची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात येत असून, शेतकरी व व्यापाऱ्यांना जनावरांच्या बाजारासाठी येण्याचे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
जनावरांच्या आठवडी बाजारामुळे शहराच्या बाजारपेठेत नक्कीच वाढ होणार असून परीसारातील पशुपालकांची चांगली सोय होणार आहे. बाजार समितीच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे .बाजार सुरू ठेवण्यासाठी सर्वोतोपरी , सर्वपक्षीय , राजकारणविरहित प्रयत्न करावेत व वाशीच्या आठवडी बाजाराला पुन्हा नावलौकिक मिळवून द्यावा आशा भावना पशुपालक शेतकर्यातून व्यक्त होत आहेत.
उभारीसाठी बंद गाळ्यांकडेही लक्ष देण्याची गरज
बाजार समितीने १२ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम केले असून सर्व व्यावसायिक गाळे आडत व्यापार्यांना भाड्याने दिले आहेत. परंतु यापैकी केवळ पाच ते सहाच आडत व्यापारी त्याठिकाणी नियमित व्यवहार करत आहेत. काही व्यवसायिकांनी आपले गाळे बंद ठेवले आहेत तर काहींनी त्यात पोटभाडे करू ठेवून त्यांचा गोडाऊन साठि वापर करण्यात येत आहे. त्यामुळे बंद असलेल्या गाळ्यांबाबतही निर्णय घेऊन बाजार समितीत नियमित व्यापार करणारे आडत व्यापारी याची संख्या वाढविण्याची गरज आहे. जेणेकरून व्यापार वाढून बाजारपेठेला उभारी मिळू शकते.
राजकारण विरहित कामाची गरज
बाजार समिती तालुक्याच्या विकासाचा आणि बाजारपेठेचा कणा आहे. आम्ही सर्व संचालकानी नेकनूर, वालवड, साळेगाव येथील बाजारात भेट देऊन व्यापार्यांना येण्याचे आवाहन केले आहे. बाजार सुरू करण्यासाठी राजकारण विरहित प्रयत्न करावेत. बाजार समितीची उलाढाल वाढावी यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी समजून प्रयत्न करणे गरजेचे आहेत.
-रणजीत गायकवाड , सभापती,
गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न
जनावरांचा आठवडी बाजार पुन्हा सुरू करण्यात आला असून शेतकरी , व्यापार्यांनी याठिकाणी विक्रीसाठी आपली जनावरे आणवीत. बाजाराला गतवैभव मिळवून देऊन तालुक्यातील व्यापार व बाजारपेठ वाढावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांनीच यात सहकार्य करण्याची गरज आहे.
-विकासभाऊ मोळवणे, व्यापारी संचालक