प्रतिनिधी / उमरगा
एका गतिमंद मुलीच्या असाहायतेचा फायदा घेत बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला.२०२१ मधील या प्रकरणात न्यायालयाने लोहारा तालुक्यातील होळी येथील आरोपीला दहा वर्षे सक्त मजुरी तसेच दहा हजार दंडाची शिक्षा सुनावली. उमरगा अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारी या खटल्याचा निकाल दिला.
होळी येथील अपंग व गतीमंद मुलगी २४ नोव्हेंबर २०२१ रोजी जेवण करून झोपली असताना रात्री अकराच्या सुमारास अचानक ओरडण्याचा आवाज आल्याने चुलत बहिणीने उठून पाहिले असता पिडीत मुलीच्या शेडमध्ये मारूती सरवदे पिडितेवर अत्याचाराचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.यावेळी पिडीतेच्या आईने आरोपीला बाजूला ढकलले. सदर मुलगी लहानपणापासूनच अपंग व गतीमंद असून, तिच्या असाहयतेचा फायदा बाब मारुती सरवदे याने घेत अत्याचाराचा प्रयत्न केला. याबाबत पिडित मुलीच्या आईने लोहारा पोलीस ठाण्यात २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मारुती जालिंदर सरवदे याच्याविरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी लोहारा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरण अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, उमरगा येथे वर्ग करण्यात आले. या प्रकरणात खटल्याची गुरूवारी सुनावणीच्या वेळी अतिरीक्त शासकिय अभियोक्ता सुषमा घोडके यांनी एकुण सात साक्षीदार तपासले. सरकारतर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ रोहिणी महादवाड, फिर्याद पिडीतेची आई व प्रत्यक्षदर्शनी फिर्यादीच्या दिराची मुलगी व तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस जी भूजबळ, एसडीपीओ रिडर व पिंक पथक, उमरगा यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. शासकीय अभियोक्ता सुषमा घोडके यांनी केलेला युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. के .अनभूले यांनी आरोपी मारुती जालिंदर सरवदे (२३, रा होळी, ता लोहारा ) यास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.