आरंभ मराठी / तुळजापूर
येथील तुळजाभवानी मंदिर संस्थान प्रशासनाकडून देऊळ कवायत कायद्यानुसार कारणे दाखवा नोटिस दिल्याने पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान करून तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांना अर्वाच्य भाषेत शिव्या देत, गोंधळ घालत तोडफोड केली. याप्रकरणी मंदिर संस्थानकडून पुजाऱ्यावर तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंदिर संस्थानद्वारे नियुक्त सुरक्षा रक्षक पुरवठादार कंपनी SISPL PVT LTD कडून संस्थानास प्राप्त अहवालानुसार अनुप कदम यांनी 13 एप्रिल 2025 रोजी मंदिराच्या व्हीआयपी गेटवर सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने मंदिरात प्रवेश केला. यानंतरच्या घटनेत 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्या दालनात कार्यालयीन कामकाज सुरू असताना अप्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मंदिर संस्थान आणि तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्याशी अर्वाच्य भाषेत हुज्जत घातल्यानंतर तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांनी कारवाई करण्याचा इशारा समक्ष देऊनही त्यास न जुमानता वाद घालत तिथेच बसले. दुसऱ्या अहवालानुसार 15 एप्रिल 2025 रोजी अनुप कदम यांनी श्रीतुळजाभवानी संस्थान कार्यालयातील CCTV कंट्रोल रूम च्या दरवाज्यास लाथ घालून दरवाजा उघडल्याची घटना घडली. सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कंट्रोल रूम मध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय प्रवेश देता येत नाही. हे दोन्ही अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिर संस्थान प्रशासनाने CCTV फुटेजचे अवलोकन करून वरील घटनांची खात्री केली आणि 12 मे 2025 रोजी कारणे दाखवा नोटिस देऊन मंदिराच्या कायदा व सुव्यवस्थेस अडथळा निर्माण होईल असे अशोभनीय वर्तन केल्याने देऊळ कवायत कायदा कलम 24 व 25 नुसार 3 महिन्यांची मंदिर प्रवेश बंदी का करण्यात येऊ नये ?, याचा लेखी खुलासा करण्यास सांगण्यात आले.
याचा राग मनात धरून अनुप कदम यांनी 13 मे रोजी पुजारी अनुप कदम यांनी मद्यपान केलेल्या अवस्थेत तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालय येथे येऊन तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीतुळजाभवानी संस्थान यांच्या नावे अर्वाच्य भाषेत शिव्या देत गोंधळ घातला. यावेळी मंदिर संस्थान कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच हाताने फोडली. या घटनेनंतर मंदिर संस्थानकडून तुळजापूर पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 221, 352, 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.