मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, देवी दर्शनानंतर मंदिराची पाहणी, मुख्यमंत्र्यांसमोर प्रशासनाकडून विकास आराखड्याचे सादरीकरण
आरंभ मराठी / धाराशिव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर दौऱ्यात अपेक्षेप्रमाणे मोठी घोषणा केली असून १८६६ कोटींच्या तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आरखड्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वतः मान्यता दिल्याचे जाहीर केले.
तसेच पुढच्या दोन वर्षात मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्यामुळे तुळजाभवानी मंदिराच्या कामास आता गती येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर दौऱ्यात देवीचे दर्शन घेतले तसेच संपूर्ण मंदिर परिसराची पाहणी केली.
यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मंदिर विकास आराखड्यानुसार होणाऱ्या बांधकामाची जाग्यावर जाऊन माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.
मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शन घेतल्यानंतर पुजारी बांधवांनी देखील त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर सांगितल्या. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन मंदिर विकास आराखड्यात कसलेही राजकारण न आणता उत्कृष्ट काम करण्याचा विश्वास फडणवीस यांनी यावेळी दिला.
यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरण पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आरखड्यास तत्त्वतः मान्यता देऊन तात्काळ निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.