सूरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर :
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथील भाविक शहाजी रामचंद्र जाधव हे आज सकाळी सपत्नीक श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरात दाखल झाले. देवीच्या दर्शनानंतर जाधव दांपत्याने भक्तिभावाने श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी ७ लाख २७ हजार रुपये किमतीचे, ५१.५४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले.
देवीचरणी अर्पण केलेले हे सुवर्ण मंगळसूत्र श्रद्धेची साक्ष देणारे ठरले.
भाविकांच्या अशा अर्पणातून तुळजाभवानीवरील अपार विश्वास आणि आस्था पुन्हा अधोरेखित झाली. या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने जाधव दांपत्याचा यथोचित सन्मान करण्यात आला. मंदिर संस्थानतर्फे त्यांना श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा व महावस्त्र भेट देऊन गौरविण्यात आले.
यावेळी सहायक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, राकेश पवार तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. देवीचरणी अर्पण केलेली ही सुवर्ण श्रद्धा भाविकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.









