आरंभ मराठी / तुळजापूर / धाराशिव
मराठवाडा व परिसरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे शेतपिके पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध घटक मदतीसाठी धावून येत आहेत.मात्र, तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी काहीच मदत केली जात नसल्याचे वृत्त दैनिक आरंभ मराठीने प्रसिद्ध केले होते.या वृत्ताची दखल घेऊन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने मोठा पुढाकार घेतला आहे. संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल १ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आरंभ मराठीने आज वृत्त प्रसिद्ध करताच मंदिर संस्थानने हा निर्णय तातडीने घेतला आहे.
याशिवाय मंदिर संस्थानमार्फत पूरग्रस्त महिलांना साड्यांचे वाटप, अन्नधान्य व अन्य आवश्यक मदतीचे साहित्य पोहोचविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून ही मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मंदिर संस्थानने यापूर्वीही आपत्तीग्रस्तांच्या वेळी समाजोपयोगी कार्य केले आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर-सांगली पूरस्थितीत संस्थानने अन्नधान्य व मदत साहित्य पाठवले होते. याच परंपरेत यंदाही संकटाच्या काळात तुळजाभवानी मंदिर संस्थान पुढे सरसावले आहे.
संस्थानने म्हटले आहे की, पूरग्रस्तांचे दुःख आमचे दुःख आहे. भक्तांच्या अश्रूंना हात पुसणे हीच आमच्या देवीची शिकवण आहे. समाजोपयोगी कार्यासाठी मंदिर संस्थान सदैव तत्पर राहील.
पूरग्रस्त भागातील शेतकरी व नागरिकांमध्ये या निर्णयामुळे दिलासा निर्माण झाला असून सर्वत्र तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.