प्रतिनिधी / तुळजापूर
यावर्षी मोसमी पावसाने अजूनही अपेक्षित एन्ट्री केलेली नाही. त्यामुळे वातावरणात उकाडा कायम असून,त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच जुलै महिन्यात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला मखमली पंख्याने हाताने वारा घालणे सुरू आहे. दरवर्षी जूनमध्येच मोठा पाऊस पडल्यावर तुळजाभवानी मातेचा पंखा थांबवला जातो,यावर्षी चित्र वेगळे आहे. दरम्यान, जिल्ह्याला दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दरवर्षी चैत्र महिन्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी तुळजाभवानी मातेला मखमली पंख्याने हाताने वारा घालण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीयेला तुळजाभवानी मातेचा पंखा प्रारंभ केला जातो.दुपारी १२ ते ४ या कालावधीत सेवेकरी पलंगे परिवाराकडे पंख्याने वारा घालण्याचा मान आहे. पावसाळ्यात मृग नक्षत्र निघून मोठा पाऊस पडेपर्यंत तुळजाभवानी मातेला पंख्याने वारा घालण्याची प्रथा आहे. मात्र यावर्षी जुलै महिना उजाडला तरी पाऊस पडला नसल्याने वातावरणातील उकाडा कायम आहे. परिणामी जुलै महिन्यात ही तुळजाभवानी मातेचा पंखा कायम आहे. दरम्यान सेवेकरी पलंगे यांनी जुलै महिना सुरू झाल्याने पंखा थांबवण्याची मंदिर संस्थानकडे विनंती केली होती.मात्र मोठ्या पावसाची प्रतिक्षा करण्याची सूचना पलंगे यांना मंदिर संस्थानने केली आहे.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात थांबतो पंखा
साधारणपणे दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात होते. त्यामुळे जुनच्या पहिल्या आठवड्यात तुळजाभवानी मातेचा पंखा थांबवण्यात येत असतो. मात्र यावर्षी ३ जुलै नंतरही तुळजाभवानी मातेचा पंखा सुरू आहे. इतिहासात पहिल्यांदाच ३ जुलैनंतरही पंखा सुरू असल्याचे धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांनी सांगितले आहे.