रामलिंग अभयारण्यातील वाघाकडून उच्छाद, जनावरांचे रोज घेतले जात आहेत बळी
आरंभ मराठी / धाराशिव
यवतमाळ येथील टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघाला अखेर जेरबंद करण्याचे आदेश राज्य सरकारने वन विभागाला दिले आहेत. गेल्या तीन आठवड्यापासून धाराशिव आणि बार्शी तालुक्यात हैदोस घातलेल्या वाघाला पकडण्याची परवानगी द्यावी अशी विनंती मागील आठवड्यात वन विभागाने राज्य सरकारकडे केली होती.
मागील आठवड्यात पाठवलेल्या पत्रात काही त्रुटी असल्यामुळे त्या त्रुटी दूर करून दुसरे पत्र राज्य सरकारला पाठवले होते. यावर शनिवारी राज्य सरकारने वाघाला पकडण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार
ताडोबा येथील दहा जणांची रॅपिड रिस्पॉन्स टीम आज धाराशिव येथील रामलिंग अभयारण्यात येणार असून, ही टीम वाघाला पकडणार आहे.
ही टीम उद्यापासून म्हणजे सोमवारपासून (दि.१३) वाघ नेमका कोठे आहे, याचा ठावठिकाणा घेईल. हा वाघ सध्या कारी-नारी परिसरात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी कारी शिवारात वाघाचे ठसे आढळून आले. तसेच त्याने सलग चार दिवस गायीचा फडशा पाडला आहे.त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या वीस दिवसांपासून वाघाने रामलिंग अभयारण्य परिसरातच तळ ठोकलेला आहे. या वाघाने मागील वीस दिवसात धाराशिव आणि बार्शी तालुक्यातील एकूण १६ गाईंचा फडशा पाडला असून, हा वाघ सुरुवातीपासून फक्त गाईंची शिकार करत आहे. वाघाला गाईची शिकार सहज उपलब्ध होत असल्यामुळे भविष्यात हा वाघ त्याच्या नैसर्गिक कौशल्याने शिकार करणारच नाही अशी भीती काही प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केल्यामुळे वाघाला पकडण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
सोमवारपासून वाघाचा ठावठिकाणा शोधून वाघाला पकडण्याची योजना आखण्यात येईल. या वाघाला पिंजऱ्यात पकडायचे की गोळी मारून बेशुद्ध करून पकडायचे हे टीम ठरवणार आहे. सध्या धाराशिव वन विभाग व सोलापूर वनविभाग एकमेकांच्या समन्वयातून वाघाला पकडण्याची योजना आखत आहेत.