आरंभ मराठी / धाराशिव
शिवसेना उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे राज्यभर लोकसभेचा प्रचार करत आहेत. राज्यभर प्रचाराला फिरण्यासाठी त्यांना पक्षाने हेलिकॉप्टरची सोय करून दिलेली आहे. आज सकाळी सुषमा अंधारेंना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सुदैवाने यात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप आहेत.
हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण समोर आलेले नाही. महाडमध्ये ही घटना घडली आहे.
सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये बसणार त्याअगोदर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. सकाळी साडेनऊ वाजता सुषमा अंधारे बारामतीच्या दिशेने जाणार होत्या. बारामती येथे आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या. बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या. हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. महत्त्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरुप आहे. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत.
नेमकं काय घडलं ?
हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले. हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे. कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते. ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. सुषमा अंधारे सुखरुप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. सध्या त्या महाडमध्येच आहेत. सुषमा अंधारे सुखरूप आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतः समाजमाध्यमावर दिली आहे.