आरंभ मराठी / धाराशिव
राज्यभरातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याचा इशारा मागच्या आठवड्यात दिला होता. त्यानुसार आज मंगळवारी एस टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, धाराशिव आगारातून आज सकाळी लवकर जाणाऱ्या दहा गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत सुटल्या. परंतु सकाळी आठ वाजता कर्मचाऱ्यांनी एकत्र येत काम बंद आंदोलन करण्याची भूमिका घेतली. त्यानंतर प्रशासनाने एसटीच्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या तोंडावरच संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यानुसार वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी आजपासून राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी मोठे आंदोलन सुरू केले आहे. कृती समितीतर्फे-शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी २ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. या मुदतीत मागण्या मान्य न केल्यास ३ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील सर्व आगारात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी हा महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे. वाहतुकीच्या बाबतीत महाराष्ट्र परिवहन मंडळ हे आशिया खंडात एक नंबरला आहे. या स्थितीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ मिळावी, यासाठी विविध संघटनांच्या माध्यमातून ही कृती समिती तयार झाली आहे. या समितीत २०१६ पासूनची मागणी राज्यकत्यांपर्यंत वेळोवेळी आंदोलन करून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. परंतु, ती मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना देखील न्याय द्यावा. वेतन आयोगाच्या धर्तीवर करार करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार वाढ द्यावी, अन्यथा कृती समितीच्या माध्यमातून सुरू केलेले आंदोलन बंद केले जाणार नाही असा इशारा समितीने दिला आहे. धाराशिव येथील आगारातून सध्या एकही बस सोडण्यात येणार नाही. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून, सध्या बस स्थानकावर शुकशुकाट आहे.