सरकारच्या बेफिकीर धोरणाचा परिणाम, व्यावसायिकांमध्ये संताप
आरंभ मराठी / धाराशिव :
इराण- इस्त्राईल ameika युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे परिणाम आता धाराशिव शहरातही दिसू लागले आहेत. कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने शहरातील हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून अनेक हॉटेल आजपासूनच बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दरम्यान, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज असताना सरकारच्या बेफिकीर धोरणामुळे व्यवसायावर संकट निर्माण झाले असून, यामुळे उद्योग व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील हॉटेल व्यावसायिकांना कमर्शियल गॅस सिलेंडर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे स्वयंपाक करणेच अशक्य झाल्याने अनेक हॉटेल मालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. काही हॉटेल मालकांनी परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी चपातीऐवजी तंदूर रोटी देणे, तसेच चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांना जेवण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र सर्वच हॉटेलधारकांना चुलीवर मोठ्या प्रमाणात जेवण तयार करणे शक्य नसल्याने बहुतांश हॉटेल बंद राहण्याची भीती व्यक्त होत आहे.
हॉटेल व्यवसायिकांच्या मते, काही वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात व्यवसाय मोठ्या प्रमाणात कोलमडला होता. त्यातून सावरत असतानाच आता आंतरराष्ट्रीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, गॅस टंचाईची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांकडून घरगुती गॅस सिलेंडरची मागणीही वाढू लागली आहे.
पुढील काळात घरगुती गॅस पुरवठ्यावरही परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घरगुती तसेच कमर्शियल गॅसचा पुरेसा साठा आणि पुरवठा सुनिश्चित करणे गरजेचे असताना याबाबत बेफिकिरी झाल्यानेच व्यवसायिकांवर हे संकट ओढवले असल्याची नाराजी हॉटेल व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे.
याबाबत धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव म्हणाले, कोरोना मध्ये झालेल्या नुकसानीतून अजून व्यवसाय सावरलेला नाही, अशा परिस्थितीत सरकारने उपाययोजना करण्याची गरज होती. गॅस सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानंतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांपासून सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या ?, हॉटेल व्यवसाय बंद झाल्यानंतर अनेकांच्या हाताला काम मिळणार नाही तसेच गॅस पुरवठ्याचा परिणाम इतर व्यवसायाला देखील बसणार आहे, सरकारने होणाऱ्या नुकसानीची भरपाई द्यावी,अशी आमची मागणी आहे.
तंदुरी रोटी देण्याचा प्रयत्न,
व्यावसायिक अर्थात कमर्शियल गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे आजपासून आम्ही हॉटेलमध्ये ग्राहकांना चपाती ऐवजी तंदुरी रोटी देण्याचा प्रयत्न करत आहोत. भाज्या देखील चुलीवर बनवल्या जात आहेत. मात्र, सगळ्यांना हे शक्य नाही. त्यामुळे काहीही झाले तरी हॉटेल व्यवसायिकांना फटका बसत आहे,असे हॉटेल प्रदीपचे मालक शेट्टी यांनी सांगितले.








