प्रतिनिधी / धाराशिव
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सहसंपर्कप्रमुखपदी धारशिवचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुखपदी परांड्याचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांची तर धाराशिव शहर प्रमुखपदी माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांची नियुक्ती झाली आहे. तर लोहाऱ्याचे दीपक जवळगे यांची जिल्हा संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून बुधवारी या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
एकीकडे राज्यात राजकीय खळबळ माजलेली असताना या सर्व सत्तानाट्यापासुन शिवसेना लांब राहुन संघटना मजबुतीकरणावर जोर देत असल्याचं दिसत आहेत.
धाराशिव जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून,आगामी काळात हा गड राखण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न चालु असल्याचे पहायला मिळत आहे.अर्थात राज्याप्रमाणे जिल्ह्यात देखील ठाकरे गटाच्या सेनेत पडझड झालेली असतानाही खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील यांच्या माध्यमातून पक्षाचे संघटन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नवे चेहरे
ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या प्रमुख पदावर शिवसेनेने नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः काही चेहरे अन्य पक्षातून आलेले आहेत.
सहसंपर्क प्रमुख असलेले अनिल खोचरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने रिक्त झालेल्या पदावर माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.भूम-परांडा-वाशी विभागाचे जिल्हाप्रमुख प्रा.गौतम लटके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याजागी जिल्हाप्रमुख म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजीव रणजित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटक म्हणून काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून पक्षात आलेले लोहारा येथील दीपक जवळगे यांची निवड करण्यात आली आहे.तर धाराशिव येथील शहरप्रमुख पप्पु उर्फ संजय मुंडे यांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर रिक्त पदावर कट्टर शिवसैनिक आणि पालिकेतील माजी गटनेते सोमनाथ गुरव यांच्यावर धाराशिव शहर प्रमुख पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
भाजपातून आलेल्यांना पद
भाजपातून शिवसेनेत गेलेल्या दिलीप पाटलांवर कळंब,भूम,परंडा,वाशीच्या संघटकपदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे. तर युवासेना प्रमुख राहिलेल्या चेतन बोराडे,प्रदिप मेटे यांच्याकडे उपजिल्हाप्रमूख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.