आरंभ मराठी / धाराशिव
एका विवाहित महिलेला दहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून तसेच अत्याचार करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर तीन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यासंबधी सविस्तर वृत्त असे की, लोहारा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विवाहित महिलेवर बेशुद्ध करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 पासून ते 19 मार्च 2026 दरम्यान आरोपी असलेल्या एका तरुणाने संबंधित महिलेला बेशुद्ध करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने महिलेचे छायाचित्र काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच तिच्या खात्यात 10 लाख रुपये टाकण्याचे आमिष दाखवून वारंवार वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित महिला आरोपीच्या दबावाला बळी पडत नसल्याचे लक्षात येताच, आरोपीने तिची छायाचित्रे तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून बदनामी करण्याचा प्रयत्न केला.
या प्रकारामुळे पीडितेने अखेर धाडस दाखवत 23 मार्च 2026 रोजी लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम 64, 64(1), 352, 356(2) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








