पुणे – हैद्राबाद महामार्गावर आणखी एक बळी
लक्ष्मण पवार / आरंभ मराठी
उमरगा : भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडल्याची घटना उमरगा तालुक्यातील येणेगुर येथे बुधवारी दुपारी घडली असून, या अपघातात एकीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरी गंभीर जखमी झाली आहे .तिच्यावर उमरगा येथे उपचार करण्यात येत आहेत.
ही घटना उमरगा तालुक्यातील सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील येणेगुर येथे घडली आहे.
या महामार्गाने आणखी एक बळी घेतला असून, ग्रामस्थांनी महामार्ग रोखून धरला आहे. गेल्या बारा वर्षापासून हायवेच्या या रखडलेल्या कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे असे आणखी किती बळी घेणार असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव श्रेया सुरेश पात्रे असून, ती येणेगुर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकत होती. तर या घटनेत श्रद्धा श्रीकांत कांबळे ही सातवीमध्ये शिकणारी विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती देखील गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे येणेगुरसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
येणेगूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे अपघात झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. तसंच संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग दोन तासांपासून रोखून धरला आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीवर कारवाईची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असले तरी गावकरी मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून, दोन तासापासून गोंधळ सुरू आहे.