जेवणासाठी काउंटर बंद, ग्राहक ताटकळले; अधिकाऱ्यांची मनमानी सुरूच
आरंभ मराठी / मुरुम
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत जेवणाच्या वेळेत संपूर्ण कॅश काउंटर बंद ठेवण्यास मनाई आहे. असे असतानाही मुरूम येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेत पुन्हा एकदा या नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचे चित्र समोर आले आहे.
दोन दिवसांपूर्वीच दैनिक ‘आरंभ मराठी’ या वृत्तपत्राने याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यानंतरही बँक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल झालेला नसून, आजही जेवणाच्या वेळेत काउंटर पूर्णतः बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सकाळपासून आलेले ग्राहक बँकेत तासन्तास ताटकळत बसलेले दिसून आले.
ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य खातेदार यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. किमान एक तरी काउंटर सुरू ठेवणे आवश्यक असताना, बँक प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. ग्राहकांनी विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे सांगितले.
पत्रकारांवर दबाव?
या प्रकरणाचा फोटो व माहिती संकलित करत असताना पत्रकारांनी विचारणा केली असता, “फोटो काढायचा अधिकार नाही” असे सांगून अडवणूक केल्याचा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक सेवेशी संबंधित बाबींवर माहिती संकलन हा पत्रकारांचा हक्क असताना, अशी भूमिका संशयास्पद ठरत आहे. जर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर ग्राहक संघटना व नागरिकांकडून RBI, बँक प्रशासन व लोकप्रतिनिधींंकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी पुढील तात्काळ मागण्या मांडल्या आहेत
ग्राहकांची तात्काळ मागणी
1. जेवणाच्या वेळेत किमान एक कॅश काउंटर सुरू ठेवावा.
2. शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना RBI नियमांची सक्तीने अंमलबजावणी.
3. ग्राहकांशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई.
4. पत्रकारांच्या कामात अडथळा आणण्याचे प्रकार तात्काळ थांबवावेत.
5. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी व RBI ने तातडीची दखल घ्यावी.









