आरंभ मराठी / धाराशिव
शिवसेना उबाठा गटाने धाराशिव जिल्ह्यात युवासेनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची संघटनात्मक नियुक्ती केली आहे. माजी नगरसेवक राणा बनसोडे यांची धाराशिव जिल्हा युवासेना संघटकपदी, तर कृष्णा पंडित मुंडे यांची शहर संघटकपदी निवड करण्यात आली आहे.
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे युवासेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवसैनिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. शिवसेना–युवासेनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवून संघटना अधिक बळकट करण्याची जबाबदारी नूतन पदाधिकारी सक्षमपणे पार पाडतील, असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, संभाजी सलगर, नगरसेवक पंकज पाटील, अभिराज कदम, राज निकम, अमित उंबरे, शौकत शेख, गौस तांबोळी यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. राणा बनसोडे यांनी आजवर पक्षासाठी दिलेले योगदान आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत व अभिनंदन होत आहे.









