गजानन तोडकर / कळंब
पर्याय संस्थेच्या वतीने तीनशे एकल महिलांना केशर आंब्याच्या रोपाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुराणा म्हणाले, पर्याय संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या केशर आंब्याच्या रोपांची लागवड करून त्याची जोपासना चांगल्या प्रकारे करावी, त्यातून चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न घेण्याची संधी प्राप्त होऊ शकते. 4 वर्षे चांगल्या पद्धतीने झाडांची जोपासना केली तर पाचव्या वर्षी उत्तम फळधारणा होते. त्यामुळे महिलांना व्यावसायिक आधार होईल, पर्याय संस्था एकल महिलांसाठी विविध काम करते. त्याबद्दल मलाआत्मीयता आहे.एकल महिलांसाठी सध्याचा काळ कठीण आहे. अनेक संकटांना अडचणींना कौटुंबिक परिस्थितीला तोंड देत आपण सक्षमपणे उभे राहून सन्मानाने जगण्यासाठी धडपडत आहात.
कार्यक्रमासाठी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांचीही उपस्थिती होती. त्यांनी महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आणि त्यांना अडीअडचणीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याबद्दल पन्नालाल भाऊंनी मनापासून समाधान व्यक्त केले.
शाहीर बंडू खराटे यांनी पर्याय संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांच्यावर काव्यसंग्रह तयार केला असून, या संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीर बंडू खराटे यांनी पोवाडा आणि गीतांचे सादरीकरण केले.
महाराष्ट्र लोकविकास मंजूचे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ यांनी एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा सुनंदाताई खराटे यांच्या कामाबद्दल कौतुक केले.
5 ऑगस्टला वृक्ष संवर्धन आणि लागवड कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र राहिलेल्या महिलांना केशर आंब्याची रोप लागवडीसाठी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आपण सर्व महिलांना केशर आंब्याची रोप देत आहोत. सर्व महिलांनी केशर आंब्याची लागवड करून अतिशय चांगल्या प्रकारे या फळझाडाची जोपासना करावी, असे आवाहन पर्याय संस्थेचे प्रमुख विश्वनाथ तोडकर यांनी केले.
कार्यक्रमाला महाराष्ट्र लोकविकास मंचचे उपाध्यक्ष भूमिपुत्र वाघ, जनविकास सामाजिक संस्थेचे प्रमुख रमेश भिसे, कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष आनंद बलाई, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, माधवसिंग राजपूत, अमर चोंदे, साक्षी पावन ज्योतचे संपादक सुभाष घोडके, राष्ट्रसेवा दलाचे विलास वकील, महिला संघटनेच्या प्रमुख सुनंदा खराटे, पर्याय संस्थेच्या अनिताताई तोडकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आश्रुबा गायकवाड यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पर्याय संस्थेचे वैभव चोंदे, विनायक, तेजश्री भालेराव, हर्षदा तोडकर, ऋषिकेश तोडकर, विकास कुदळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.