आरंभ मराठी / धाराशिव
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या अंडरपासच्या कामांच्या ठिकाणी योग्य काळजी घेतली गेली नसल्याने अपघाताच्या घटना घडत असून, शनिवारी सकाळी मध्य प्रदेशातील भाविकांच्या वाहनाला अपघात होऊन पाच जण जखमी झाले आहेत.त्यामुळे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धुळे-सोलापूर महामार्गावर येडशी येथील सोनेगाव फाटा परिसरात भुयारी मार्ग तसेच सर्व्हिस रोडचे काम सुरु आहे.
कामामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.कारण रस्त्याचे काम सुरू असल्याने केवळ एकच वाहन जाऊ शकेल एवढी जागा सोडण्यात आली असून,त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे तसेच कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नसल्याने वाहनांना अचानक ब्रेक लागत आहेत.
आज सकाळी मध्यप्रदेशातील काही भाविक क्रुझर गाडीने तुळजापूरला दर्शनासाठी जात असताना काम सुरू असलेल्या ठिकाणी समोरील ट्रकने अचानक ब्रेक लावले.त्यामुळे ट्रकवर क्रुझर आदळली. यावेळी अपघात होऊन क्रूझरमधील पाच जण जखमी झाले आहेत.
वाहनांची प्रचंड गर्दी असलेल्या महामार्गावर प्रशासनकडून इतकी बेपर्वाई करण्यात येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.जखमींना धारशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.








