आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव नगरपालिकेच्या १४० कोटींच्या रस्ते कामांवरून राजकीयवाद टोकाला गेला आहे. भाजप तसेच महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन केल्यानंतर आज शिवसेनेने या प्रकरणात उडी घेतली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एका विशिष्ट ठेकेदाराला लाभ मिळवून देण्यासाठी टेंडर प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने म्हणजेच 15 टक्के वाढीव दराने राबवली, असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सूरज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आमच्या तक्रारीनंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामाला स्थगिती दिली, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
साळुंखे म्हणाले, नगरपालिकेच्या १४० कोटींच्या रस्ते कामासाठी भाजप नेत्यांनी एकाच ठेकेदाराचा अट्टाहास धरला आहे. हा अट्टाहास कोणासाठी आणि का ? लाडके ठेकेदार कोण आहेत, याची जनतेला माहिती मिळायला हवी.
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की, कुणासाठी अंगावर घेऊ नका. तुम्हाला यातील एकही काम मिळणार नाही, पण आम्ही चुकीच्या पद्धतीला कधीही पाठिंबा देणार नाही. टेंडर प्रक्रियेत अनियमितता असल्याची कबुली एका वरिष्ठ म्हणजे सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने दिली होती. तरीसुद्धा २५ सप्टेंबरच्या दुसऱ्या बैठकीत नगरविकास विभागावर दबाव आणून निविदा मंजूर करण्यात आल्या.
मुख्यमंत्री फडणवीस यांना अशा चुकीच्या पद्धती पटत नाहीत, म्हणूनच त्यांनी तत्काळ स्थगितीचे आदेश दिले, असा साळुंखे यांचा दावा आहे.
शहराची वाट लावली, रस्ते फोडले; भाजप आणि उबाठा गटावर आरोप
साळुंखे यांनी भाजपसोबतच शिवसेना उबाठा गटातील नेत्यांनाही लक्ष्य केले. धाराशिव शहराचा विकास थांबवण्यामागे शिवसेना उबाठा गटच जबाबदार आहे. शहराचे रस्ते फोडून ठेवले, भुयारी गटारपेक्षा अन्य विकास योजना राबवल्या असत्या तर शहराचे रूप बदलले असते,असा घणाघात त्यांनी केला.
_
४० कोटींच्या कामांना शिंदे–सावंत–सरनाईक यांचे श्रेय
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजीमंत्री तानाजी सावंत आणि विद्यमान पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांतूनच १४० कोटींची कामे मंजूर झाली होती, असे साळुंखे यांनी सांगितले. मात्र १५ टक्के वाढीव टेंडरसाठी दबाव आणल्यामुळे आम्ही विरोध केला. आम्ही शिवसैनिक आहोत, चुकीच्या पद्धतीला भीक घालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
‘टेंडर मॅनेज करण्याचा खेळ सुरू’
नगरपालिकेतील काही अधिकारी ठराविक नेत्यांच्या सांगण्यावरून टेंडर मॅनेज करत असल्याचा आरोप करत साळुंखे म्हणाले, अनेक चुकीची कामे झाली आहेत, पण आता आम्ही ती खपवून घेणार नाही. गरज पडली तर न्यायालयात जाऊ.यावेळी सुधीर पाटील,शहरप्रमुख आकाश कोकाटे उपस्थित होते.












