प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव पोलीस पथकाने कर्नाटकातून बीडला जाणारा पान मसाला तसेच तंबाखूचा साठा ताब्यात घेतला असून,टेम्पोसह सुमारे 41 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री शहरातील एमआयडीसी परिसरात धुळे-सोलापूर महामार्गावर करण्यात आली.
पोलिसांनी सांगितले की, गुप्त बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आनंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने कर्नाटक राज्यातुन बीडकडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित केलेला पानमसाला, तंबाखु व टेम्पो असा एकुण ४१,४०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तुळजापुरकडुन बीडकडे जात असलेला एक चॉकलेटी रंगाचा टेम्पो (ए.पी. २३ डब्ल्यु २९९९) शहरातील एमआयडीसी उड्डाणपुल येथे पकडुन त्यातील मालाबाबत चालक मोहम्मद इरफान मोहम्मद आरीफ (वय २७ वर्षे, व्य. चालक, रा. एम.एस.के.मिलजवळ, जिलानाबाद, गुलबर्गा) (कर्नाटक) व त्याचा सहकारी सय्यद आसीफ सय्यद रुकमोद्दीन (वय २६ वर्षे, रा. कडगंची, गुलबर्गा विद्यापीठ जवळ, गुलबर्गा) (कर्नाटक) यांना विचारणा केली असता त्यांनी सदर टेम्पोमध्ये पान मसाला, तंबाखु असा मुद्देमाल असल्याचे कबुल केले. सदर वाहनात शासनाने प्रतिबंधित केलेले पदार्थ असल्याची खात्री झाल्याने संबंधितांकडून ताब्यातील मुद्देमाल असे टेम्पोसह पोलीस ठाणे आनंदनगर येथे आणून दोघांविरुद्ध कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, आनंद पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड, पोहवा ज्ञानदेव कांबळे, सचिन खंडेराव, पोकाँ ज्ञानेश्वर कागदे यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि गोरक्ष खरड हे करत आहेत.