आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून वाघ आणि बिबट्या या हिंस्र प्राण्यांनी दहशत निर्माण केली आहे. दर दोन दिवसाला पाळीव जनावरांवर हल्ले करून त्यांचा बळी घेण्याची मालिका सुरूच आहे. सोमवारी पहाटे धाराशिव तालुक्यातील पिंपरी या गावाच्या शिवारात ओम नाईकवाडी यांच्या शेतातील एका गाईची हिंस्र प्राण्याने शिकार करून गाईचा बळी घेतला.
रात्री बाहेर मोकळ्या जागेत बांधलेल्या गाईवर हिंस्र प्राण्याने हल्ला केला. घटनास्थळी वनविभागाचे आणि पशुसंवर्धन विभागाचे पथक दाखल होऊन त्यांनी गाईचा पंचनामा केला आहे. वाघ पकडण्यासाठी पुण्याहून आलेली रेस्क्यू टीमदेखील घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी संपूर्ण भागात फिरून पायांचे ठसे मिळतात का याची पाहणी केली आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने आणि वारा सुरू असल्याने पायांचे ठसे नेमके वाघाचे आहेत की बिबट्याचे आहेत याचा वनविभागाला आणि रेस्क्यू टीमला अंदाज लावता येत नाही. हा हल्ला वाघाने केला की बिबट्याने केला हे निश्चितपणे सांगता येत नसल्याचे वन विभागाने म्हटले आहे. सध्या मृत गाईला तिथेच ठेवण्यात आले असून, त्या भागात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.
शिकार केलेला प्राणी पुन्हा त्या ठिकाणी येण्याची शक्यता गृहीत धरून वन विभागाचे आणि रेस्क्यू टीमचे बारीक लक्ष त्या परिसरावर आहे. गाईवर केलेला हल्ला हा पिंपरी गावापासून पन्नास ते शंभर मीटर अंतरावर असल्यामुळे वाघ किंवा बिबट्या असला तरी त्याने गावाच्या जवळ येऊन हल्ला केल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. सध्या परिसरतील ऊस तोडणी झालेली आहे.
ज्वारी आणि गव्हाची काढणी सुरू आहे त्यामुळे वाघ आणि बिबट्याला लपण्यासाठी जागा नसल्यामुळे उघड्या शेतात त्यांचा वावर वाढला आहे. त्यातूनच मानवावर हल्ला होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जनावरांना गोठ्यात न बांधता ज्वारी काढलेल्या मोकळ्या जागेत चरण्यासाठी लांबून बांधले जाते.
या जनावरांची शिकार करण्यासाठी वाघ आणि बिबट्याला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत त्यामुळे मागील आठ दिवसांपासून पाळीव जनावरांच्या शिकारीचे प्रमाण वाढले आहे. वाघाला जेरबंद करेपर्यंत हा धोका असल्यामुळे लवकरात लवकर वाघाला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.