सुरज बागल / आरंभ मराठी
तुळजापूर –
तुळजापूर ड्रग्स रॅकेट प्रकरणी आणखी एका आरोपीस पोलीसांनी शुक्रवारी अटक केली आहे. तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे यास तुळजापूर येथून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणातील लोकल कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अजूनही फरार आहे.
शहरातील ड्रग्सचे हे रॅकेट खोलवर पसरले असण्याची शक्यता असून, पोलीस तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहेत.
दरम्यान सुरुवातीस अटक केलेल्या तीन आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार असून त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
यापूर्वी मुंबई येथून एका महिलेस तर मुंबई येथील एका पुरुषाला तुळजापूर मधून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस करत आहेत.