लोकप्रतिनिधी लक्ष देणार का, प्रवाशांतून नाराजी
आरंभ मराठी / धाराशिव
मध्य रेल्वेने ९ एप्रिल ते २५ जून दरम्यान उन्हाळी सुट्टीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते हजूरसाहिब नांदेड व्हाया कल्याण, पुणे, कुडुवाडी, बार्शी, धाराशिव, लातूर मार्गे विशेष रेल्वेगाडी सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
या विशेष रेल्वे गाडीच्या एकूण २४ फेऱ्या पूर्ण करण्याचे मध्य रेल्वेचे नियोजन आहे. परंतु, या उन्हाळी सुट्टी स्पेशल रेल्वेला धाराशिव शहरात मात्र थांबा न देता तो थेट लातूरला दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचे ठिकाण असूनही धाराशिव शहरावर मध्य रेल्वेकडून अन्याय केला जात आहे.
मध्य आणि दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-मुंबई एलटीटी विशेष रेल्वे सोडण्याचे नियोजन केले आहे. रेल्वे क्रमांक ०११०५ मुंबई एलटीटी-नांदेड रेल्वे ९ एप्रिल ते २५ जूनदरम्यान दर बुधवारी मध्यरात्री १२:५५ वाजता मुंबई येथून सुटणार आहे. ती रेल्वे दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता नांदेडला पोहोचणार आहे. या रेल्वेला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडी, लातूर, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा येथे थांबे देण्यात आले आहेत. मात्र धाराशिव शहराला मात्र थांबा देण्यात आलेला नाही.
दर बुधवारी रात्री साडेदहा वाजता ही ट्रेन नांदेडहून सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी पावणे तीन वाजता मुंबई एलटीटीला पोहोचणार आहे. कुर्डुवाडी स्टेशननंतर ही ट्रेन धाराशिवला न थांबता थेट लातूरला थांबणार आहे. त्यामुळे मुंबईहून धाराशिवला येणाऱ्या प्रवाशांना लातूर किंवा कुर्डुवाडीला उतरावे लागणार आहे. धाराशिव स्टेशनवरून जात असूनही या ट्रेनला धाराशिव शहरात थांबा न देण्याचे कारण रेल्वेने स्पष्ट केले नाही.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज –
रेल्वेच्या या पक्षपाती धोरणावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज आहे. अगोदरच लातूर – मुंबई या ट्रेनमध्ये जागा उपलब्ध असतानाही धाराशिवच्या स्टेशनवर ट्रेनचे दरवाजे मुद्दाम उघडले जात नसल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. त्यातच लांब पल्ल्याच्या नांदेड – मुंबई ट्रेनला थांबाच न दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यावर अन्याय केला जात आहे. याविषयी खासदार, सर्व आमदार आणि सर्वपक्षीय नेत्यांनी रेल्वेच्या पक्षपाती धोरणाविरोधात आवाज उठवण्याची गरज आहे.