बिबट्याला पकडल्यानंतर वाघ शोधण्याची मोहीम गतिमान
आरंभ मराठी / धाराशिव
वनविभाग एकीकडे रामलिंग अभयारण्यात आलेल्या वाघाला पकडण्यासाठी जंग जंग पछाडत असताना दुसरीकडे परंडा तालुक्यातील सैरभैर झालेला बिबट्या मात्र अलगद पिंजऱ्यात कैद झाला. वनविभागाच्या केवळ तीन लोकांच्या पथकाने बिबट्याला पकडण्याची कामगिरी फत्ते केल्यानंतर आता वाघ हाती कधी लागतो याची प्रतीक्षा आहे.
पुण्याच्या रेस्क्यू टीममध्ये आणखी पाच लोकांचा समावेश करण्यात आला असून, दोन डॉक्टर आणि शूटर यांचा समावेश केल्यामुळे वाघ पकडण्याची मोहीम आता आणखी गतिमान होणार आहे.वन विभागाच्या माहितीनुसार वाघ अद्याप रामलिंग अभयारण्यातच असून, त्याला पकडण्यासाठी आता टीम ऍक्शन मोडवर आली आहे.
मागील तीन महिन्यांपासून धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला वाघ अजूनही हाती लागलेला नाही. पुण्याची रेस्क्यू टीम मागील दोन महिन्यांपासून वाघाचा शोध घेत आहे. मात्र वाघ सतत चकवा देऊन पसार होत आहे. या वाघाने आतापर्यंत धाराशिव, वाशी, भूम, परंडा आणि बार्शी या भागातील पन्नास पेक्षा अधिक जनावरांची शिकार केली आहे. शिकार केल्यानंतर हा वाघ जागा बदलत असल्यामुळे रेस्क्यू टीम तिथे पोहोचेपर्यंत वाघाने दूर पळ काढलेला असतो. त्यामुळे मोहीम यशस्वी होण्यात अडचणी येत आहेत. वाघाला जेरबंद करण्यासाठी डार्ट गनचा तीनवेळा केलेला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रेस्क्यू टीमकडून नवीन योजना आखून वाघ पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
दोन पथकांमार्फत शोधमोहीम –
पुण्याच्या रेस्क्यू टीममध्ये आठ लोकांचा समावेश आहे. त्यामध्ये डॉक्टर आणि शूटर आहेत. परंतु, वाघाने एखाद्या ठिकाणी शिकार केल्यानंतर सर्व टीमला त्याठिकाणी जावे लागत होते. डॉक्टर आणि शूटर यांची संख्या कमी असल्यामुळे या टीममध्ये आणखी पाच लोकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टर आणि शूटर आहेत, त्यामुळे रेस्क्यू टीमची दोन पथके करून वाघाचा शोध घेतला जाणार आहे.
यापुढे दोन सेटअप –
वाघाला पकडण्यासाठी आतापर्यंत रेस्क्यू टीमकडून शिकार केलेल्या जागी एकच सेटअप तयार करण्यात येत होता. शिकार केलेल्या प्राण्याच्या आसपास हा सेटअप तयार केला जात होता. आता रामलिंग अभयारण्यात एक आणि बाहेर शिकार केलेल्या ठिकाणी एक अशा दोन ठिकाणी ट्रॅप लावण्यात आलेला आहे. त्यामुळे एकाचवेळी दोन जागी वाघाला कैद करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
वाघ सध्या अभयारण्यातच –
वाघ सध्या रामलिंग अभयारण्यातच वावरत आहे. गुरुवारी (दि.२०) तो अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आला होता. वाघाकडून फक्त पाळीव जनावरेच नाही तर अभयारण्यातील रानडुक्कर, मोर आणि इतर प्राण्यांची देखील शिकार केली जात आहे. रामलिंग अभयारण्यात लावलेल्या पंधरा ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे दर एक दोन दिवसाला दर्शन होत आहे.
परवानगी मिळण्यापूर्वीच सापडला बिबट्या –
एकीकडे वाघाला पकडण्यासाठी वणवण भटकणाऱ्या वन विभागाला बिबट्या मात्र फारसे कष्ट न करता हाती लागला आहे. परंडा तालुक्यातील कपिलापुरी भागात दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला पकडण्याची परवानगी वनविभागाकडून मागण्यात आली होती. परंतु, परवानगी मिळण्याच्या अगोदरच बिबट्या सापळ्यात कैद झाला. त्या बिबट्याला पुणे जिल्ह्यात सुरक्षित ठिकाणी घेऊन गेल्याची माहिती मिळाली. वनविभागाच्या स्थानिक तीन लोकांनीच शेतकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पकडण्याची मोहीम फत्ते केली.