धाराशिव शहरात चोरांची टोळी सक्रिय, पंधरा दिवसात तीन महिलांना वर्दळीच्या ठिकाणी लुटले
चोरीच्या घटना, लुटमारीने नागरिक हवालदिल
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरात सोनसाखळी चोरांची टोळी सक्रिय झाली असून, भर रस्त्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी चोरी करण्याची हिंमत चोरट्यांकडून केली जात आहे. मागील पंधरा दिवसात शहरात तीन घटना घडल्या असून, बस स्थानकावर देखील महिलांना लक्ष करून लुटले जात आहे. वाढत्या चोरीच्या प्रकारामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिला भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.
सध्या धाराशिव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील एक महिन्यात शहरातील चोरीच्या गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, एकही चोर पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे चोरटे मुजोर झाल्याचे चित्र दिसत आहे. घराबाहेर पडणाऱ्या महिलांचे दागिने शिताफीने चोरून पोबारा करणाऱ्या चोरट्यांची संख्या वाढली आहे.
महिलांच्या गळ्यातील दागिने रस्त्यावरच लुटून धूम ठोकून पळून जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसात धाराशिव शहरात घडत आहेत. सोबतच घरे लुटणाऱ्या आणि दुचाकी लुटणाऱ्या टोळ्यादेखील सक्रिय असून यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
मागील पंधरा दिवसात ज्या घटना घडल्या यामध्ये पहिल्या घटनेत सातारा येथील रहिवासी असणाऱ्या रोहीनी गणेश जाधव (वय 36) या त्यांच्या पतीसह दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वर्षे वरुडा ब्रीज जवळील पेट्रोल पंपाच्या पुढे धाराशिव वरून येरमाळ्याकडे जात होत्या. त्यावेळी युनिकॉर्न कंपनीच्या काळ्या रंगाच्या नंबर नसलेल्या मोटरसायकलवरुन तीन अनोळखी इसमांनी पाठीमागून येवून रोहीनी जाधव यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरीने चोरुन चोरटे निघून गेले. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत मनिषा विश्वास शेवाळे (वय 32 वर्षे) या महिला दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी बँक कॉलनी येथील सरस्वती शाळेसमोरून गजानन मंदिराकडे जात होत्या. त्यावेळी पोस्ट कॉलनीतील लक्ष्मी मंदीर येथे समोरुन येणाऱ्या काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरील अनोळखी दोन इसमापैकी मागे बसलेल्या व्यक्तीने मनिषा शेवाळे यांच्या गळ्यातील 11 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरीने लटुन चोरटे पसार झाले. हा गुन्हा देखील आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला आहे.
तर तिसऱ्या घटनेत दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता धाराशिव येथील भक्ती बालाजी साळुंके (वय 41 वर्षे) या जिल्हा कारागृहाच्या पाठीमागून स्कुटीवरुन त्यांच्या घराकडे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी मोटार सायकलवर येऊन भक्ती सांळुके यांच्या गळ्यातील 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण जबरीने लटून चोरटे पसार झाले. आनंदनगर पोलीस ठाण्यात नेहमीप्रमाणे गुन्हा दाखल झाला परंतु, यातील चोरटे सापडले नाहीत. तीनही गुन्ह्यात चोरी करण्याची पद्धत सारखीच आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील गुन्हेगार एकच असण्याची शक्यता आहे.
विना नंबर गाड्यांचा चोरीसाठी होत आहे वापर –
चोरट्यांकडून विना नंबरच्या मोटार सायकलचा वापर चोरीसाठी केला जात आहे. यामध्ये विशेषतः युनिकॉर्न कंपनीच्या गाड्यांचा वापर केला जात असल्याचे दिसून येते. चोरटे चेहऱ्यावर रुमाल बांधून किंवा हेल्मेट घालून चोरी करत आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडूनच विना नंबरच्या गाड्यांवर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
बस स्थानकावर देखील महिलांना केले जातेय लक्ष –
रस्त्यावर चोऱ्या करण्यासोबतच बस स्थानकावर देखील महिलांचे दागिने लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवजयंती दिवशी दुपारी बारा वाजता वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील पदमजा दत्तात्रय धालगडे, (वय 47) या महिला धाराशिव बसस्थानक येथे धाराशिव ते औसा एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून चोरट्याने यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. मागील महिन्यात देखील धाराशिव बस स्थानकात सोने चोरल्याच्या तीन घटना घडल्या होत्या. परंतु, यातील एकाही चोरट्याला पकडण्यात यश आले नाही.
नवीन पोलीस निरीक्षकांसमोर आव्हान –
धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये तुळजापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांची बदली आनंदनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून धाराशिव शहरातील वाढत्या चोऱ्या पाहता चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान रवींद्र खांडेकर यांच्यासमोर असणार आहे.
गुन्ह्यांचा छडा लावण्याला प्राधान्य देणार –
धाराशिव शहर आणि परिसरात महिलांचे दागिने लुटल्याच्या घटना अलीकडच्या काळात घडलेल्या आहेत. या घटनांचा सखोल तपास करून गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी प्रयत्न केले जातील.
रवींद्र खांडेकर,
पोलीस निरीक्षक
आनंदनगर पोलीस स्टेशन.