कमी रकमेमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
आरंभ मराठी / धाराशिव
२०२४ च्या खरीप हंगामातील पीक विमा वितरणास अखेर आज सुरुवात झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे अडीचशे कोटी रुपये मंजूर होऊन महिना झाला होता.
त्याचे वितरण अखेर सुरू झाले आहे. ई केवायसी असणाऱ्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे हे वाटप आज सकाळी सुरू झाले. परंतु, हेक्टरी अत्यल्प रक्कम मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पीक विम्यावरून नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे.
महसूल मंडळानुसार पीक विम्याची रक्कम वेगवेगळी आहे. हेक्टरी ६००० ते ६२०० च्या दरम्यान वितरण होत आहे. खरीप २०२४ मध्ये धाराशिव जिल्ह्यातील ७ लाख १९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. अतिरिक्त पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले होते.
नुकसान झालेल्या ५ लाख ९१००० शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना दिली होती. त्यातील ५ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या होत्या. याच शेतकऱ्यांना सध्या नुकसान भरपाई मिळत आहे.
धाराशिव जिल्ह्याला २५७ कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात यातील २०८ कोटी रुपयांचे कंपनीकडून वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज आणि उद्या २०८ कोटींचे वितरण होईल आणि त्यानंतर राहिलेली रक्कम वितरित करणार असल्याचे पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने सांगितले.
केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२४ रोजी काढलेल्या जाचक परिपत्रकामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी १९००० रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी केला आहे. याविरोधात जगताप यांनी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
त्यावरही लवकरच सुनावणी होणार आहे. ८०/११० या बीड पॅटर्ननुसार या पीक विम्याचे वितरण होत असून, या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही त्या शेतकऱ्यांना पोस्ट हार्व्हेस्ट या घटनांतर्गत पीक विमा मिळणार आहे.